Pune : सतारीवर झंकारला सायंकालीन ‘मारवा’ तर अंकिता जोशी यांच्या रंगतदार ‘मुलतानी’ ने रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज –  युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ( Pune)  मेवाती घराण्याच्या गायिका अंकिता जोशी यांच्या दमदार आणि तयारीच्या सादरीकरणाने 69 व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध गाजवला. त्यानंतर सतारीवर झंकारलेला ‘मारवा’ ही दाद मिळवणारा ठरला.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात संपन्न होत आहे. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद यांच्यासह प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर आवर्जून उपस्थित होते.

Pimpri : दारिद्र्य व कुपोषणाच्या दुष्टचक्रातून मातांना बाहेर काढणाऱ्या समिना शेख यांना टाटा मोटर्सतर्फे कौतुकाची थाप

अंकिता जोशी यांनी आपल्या गायनाची सुरवात राग ‘मुलतानी’ने केली. ‘गोकुल गाव का छोरा’ या पारंपरिक रचनेतून आणि त्याला जोडून ‘अजब तेरी बात’ या बंदिशीतून तसेच ‘आये मोरे साजनवा’ या द्रुत रचनेतून त्यांनी राग मांडणी साधली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील झरीना या व्यक्तिरेखेसाठी पार्श्वगायन केलेली ‘दिल की तपिश’ ही राग किरवाणीवर आधारित रचना त्यांनी सादर केली.

रसिकांनी या रचनेला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. अंकिता यांनी ‘नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला पाहू’ या अभंगाने गायनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर यांनी, संवादिनीवर अभिनय रवंदे तसेच खंजिराची साथ धनंजय कंधारकर यांनी व टाळांची साथ माऊली टाकळकर यांनी केली. तानपुरा साथ मानसी महाजन आणि अदिती रवंदे यांनी केली.

सवाईच्या दुसऱ्या दिवशी दुसरे सत्र प्रसिद्ध सतार वादक पं. पार्थ बोस यांच्या बहारदार सतार वादनाने रंगले. मैहर घराण्याचा वारसा जपणाऱ्या पं. पार्थ यांनी वादनासाठी राग मारवा निवडला होता. आलाप, जोड, झाला या क्रमाने त्यांचे वादन रंगत गेले. राग खमाज मधील गतमाला (एकाच तालात विविध बंदिशी) सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर अप्रतिम साथ केली.

त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. उपेंद्र भट यांचे  गायन झाले. त्यांनी राग शुद्धकल्याण मध्ये विलंबित एकतालात ‘तुमबिन कौन’ ही रचना आणि ‘रस भिनी भिनी’ ही बंदिश सादर केली. पं. भीमसेनजी तसेच पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाल्यानिमित त्यांना अभिवादन म्हणून त्यांनी ‘इंद्रायणी काठी’ ही गाजलेली भक्तिरचना सादर करत आपला आदरभाव व्यक्त केला. त्यांना हार्मोनियमवर निरंजन लेले, तबल्यावर मंदार पुराणिक, माऊली फाटक (पखवाज), विश्वास कळमकर (टाळ), तसेच देवव्रत भातखंडे, धनंजय भाटे व अनमोल थत्ते यांनी तानपुरा व स्वरसाथ ( Pune)  केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.