Pune: धक्कादायक! ससून रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरला कोरोनाची लागण

संपर्कातील डॉक्टर व कर्मचारी क्वारंटाईनमध्ये

एमपीसी न्यूज – पुण्यातील करोनाबाधितांना उपचार देणाऱ्या ससून रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरला करोनाची लागण झाली असून त्यांना ससूनमध्येच सुरू करण्यात आलेल्या विशेष कोरोना रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. हे डॉक्टर महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील रुग्णांवर उपचारासाठी देखील जात होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

नायडू रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या औषधशास्त्र, भूलशास्त्र व छातीचे रोग विभागातील डॉक्टरांचे पथक जाते. या पथकातील डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करतात. वैद्यकीय गुंतागुंत असलेल्या, चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी अनेकदा वरिष्ठ डॉक्टरांना जावे लागते. रुग्णांच्या प्रकृतीची तपासणी करून उपचार करावे लागतात. त्यातूनच ससून रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरलाच करोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयातील आयसोलेशन (अलगीकरण) वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

‘लक्षणे दिसताच पाच दिवसांच्या आत आम्ही त्या व्यक्तींची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणे दिसली नाही, तर पाच दिवसांनंतर त्यांची तपासणी करण्यात येईल. सध्या एका वरिष्ठ डॉक्टरांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे,’ असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टर व परिचारिकांना सर्वाधिक जोखीम

दरम्यान, प्रशासकीय काम पाहणाऱ्या आणखी एका डॉक्टरला क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापूर्वी ससून रुग्णालयातील तीन परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, डॉक्टरांना लागण झाल्याने काहीसे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. खासगी रुग्णालयांतील दोन डॉक्टरांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे डॉक्टर बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) होते. त्यांना कोणतेही सुरक्षा किट पुरवण्यात आले नाही. म्हणून त्यांना बाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हे दोन्ही डॉक्टर पॉझिटीव्ह असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.