Pune Sports News : ‘अष्टपैलू करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत त्रिनिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद

एमपीसी न्यूज – ‘अष्टपैलू करंडक’ १४ वर्षाखालील अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्रिनिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने राऊंड रॉबिन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६१ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात अर्थव सावंत याने केलेल्या नाबाद ७५ धावांच्या खेळीमुळे त्रिनिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने राऊंड रॉबिन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना त्रिनिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने २० षटकामध्ये ५ गडी गमावून १७० धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये अर्थव सावंत याने ६० चेंडूत १२ चौकारांसह नाबाद ७५ खेळी केली. यासह कृष्णा देशमुख (२१ धावा) आणि वीर चोरडीया (१७ धावा) यांनी संघाला १७० धावांचा टप्पा गाठून दिला.

या आव्हानाचा पाठलाग करताना राऊंड रॉबिन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव काहीसा भरकटला. त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. संघाकडून नीलमेघ नागवकर (३२ धावा), संस्कार सोनावणे (२४ धावा) आणि श्रेयस शिवरकर (२१ धावा) यांनी संघाकडून प्रतिकार केला. पण तरीही संघाला २० षटकात ४ गडी गमावून १०९ धावाच जमविता आल्या.

विजेत्या त्रिनिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि पदके देण्यात आली. यावेळी ट्रिनिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे मेन्टॉर सौरभ जगदाळे यांनी सागितले की, अ‍ॅकॅडमीचे तसेच सर्व सहभागी खेळाडूंचे हे सांघिक यश आहे. अ‍ॅकॅडमीव्दारे अशाच प्रकारच्या चढत्या आणि सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. यामधूनच गुणवान आणि युवा खेळाडून निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सामन्याचा संक्षिप्त निकाल – अंतिम सामना –
त्रिनिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी – २० षटकात ५ गडी बाद १७० धावा (अर्थव सावंत नाबाद ७५ (१२ चौकार),  कृष्णा देशमुख २१,  वीर चोरडीया १७,  साई बोर्‍हाडे १-२६) वि.वि. राऊंड रॉबिन क्रिकेट अ‍ॅकॅडमी – २० षटकात ४ गडी बाद १०९ धावा (नीलमेघ नागवकर ३२, संस्कार सोनावणे २४, श्रेयस शिवरकर २१, प्रथमेश आवारे २-१३); सामनावीरः अर्थव सावंत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.