Pune : दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचा शनिवारी शतक महोत्सवी सोहळा; अध्यक्ष रवींद्र जोशी यांची माहिती

एमपीसी न्यूज – शब्दांमधला अर्थ कागदावर उमटवण्याचे कसब हे मुद्रकाकडेच असते. अशाच मुद्रकांनी एकत्र येत १९१९ साली पुण्यात भारतातील मुद्रण व्यावसायिकांच्या पहिल्या संस्थेची स्थापना केली. हीच दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन आपल्या स्थापनेची शंभरी साजरी करीत आहे. याचेच औचित्य साधत संस्थेच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुणे- नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी येथे येत्या शनिवारी (दि. २१) सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. रवींद्र जोशी हे दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन बरोबरच दिल्ली येथील अखिल भारतीय मुद्रक संघाचे देखील राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यावेळी असोसिएशन उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना रवींद्र जोशी म्हणाले, इंग्रजांच्या काळात मुद्रण व्यवसायाने पुणे शहरात बाळसे धरले. पहिल्या महायुद्धा नंतर शाई व कागद यांचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर मुद्रकांना संघटना स्थापन करीत एकत्र येण्याची गरज भासू लागली. यावेळी पुण्यातील आर्यभूषण, चित्रशाळा, केसरी आदी नामवंत मुद्रणालयांच्या मालकांबरोबर बालोद्यान मुद्रणालयाचे मालक बाबुराव सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने १९ मे १९१९ रोजी शहरातील २० ध्येयवादी मुद्रकांनी एकत्र येत मुद्रण क्षेत्राचा प्रसार, प्रचार व्हावा, नव्या तंत्रज्ञांनाची माहिती मुद्रकांना व्हावी या उद्देशाने दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनची स्थापना केली.

मुद्रकांनी मुद्रकांसाठी व या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी स्थापन केलेली जगातील पहिली व सर्वांत जुनी संस्था. विशेष म्हणजे पुढे दिल्ली येथील अखिल भारतीय मुद्रक संघ, महाराष्ट्र मुद्रण परिषद आणि पुणे जिल्हा मुद्रण संघ यांची स्थापना देखील दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनने केली. हीच संस्था आता आपली शंभरी साजरी करीत असून यानिमित्ताने शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये शनिवारी (दि. २१ ऑगस्ट) पंजाब केसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य संपादक आणि पीटीआयचे अध्यक्ष विजय कुमार चोपडा यांना मुद्रण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

याबरोबरच मुद्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ८ व्यक्तींचा देखील संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका ज्येष्ठ महिला मुद्रकाचा देखील समावेश आहे. संस्थेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा असलेल्या ‘शतमुद्रा’ या ग्रंथाचे प्रकाशन, गेली ८० वर्षे संस्थेच्या वतीने काढण्यात येत असलेल्या ‘मुद्रण प्रकाश’ या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन आणि मुद्रणविषयक खास पोस्टल स्टॅम्प व पाकिटाचेही अनावरण यावेळी करण्यात येणार आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची झलक दाखविणा-या ‘कथा शंभर पानांची’ या माहितीपटाचे प्रदर्शनही यावेळी करण्यात येईल.

सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, टोयो इंक इंडियाचे अध्यक्ष हरुहीको अकुत्सू सान, टेकनोवा इमॅजिंग सिस्टिम्सचे अध्यक्ष प्रणव पारीख, पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल एस. एफ. एच. रिज्वी, हरियाणाच्या दिनबंधू छोटू राम विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेंद्रकुमार अनायथ हे देखील यावेळी उपस्थित असतील. याबरोबरच २० व २२ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मुद्रक संघाची सर्वसाधारण सभा व नियामक मंडळाची बैठकही या ठिकाणी पार पडेल ज्यामध्ये देशभरातील तब्बल ६०० ते ७०० मुद्रक सहभागी होणार आहेत.

आज मुद्रण क्षेत्र हे जगभरात दुस-या क्रमांकाचे व्यवसाय निर्मिती करणारे क्षेत्र असून भारतामध्ये सुमारे ३ लाख मुद्रक आहेत. याबरोबरच सुमारे ३५ ते ४० लाखांहून अधिक नागरिकांना या क्षेत्रामुळे रोजगार मिळतो. असे असताना मुद्रण व्यवसायाचा प्रचार, प्रसार होण्याबरोबरच या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मुद्रकांना मिळावी, त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांवर उत्तरे मिळावीत, चर्चा व्हावी या उद्देशाने दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन एक संघटन म्हणून कार्यरत आहे. मुद्रण क्षेत्राबरोबरच संस्था सामाजिक क्षेत्रातही हिरीरीने सहभागी होत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले, नजीकच्या भविष्यात मुद्रण क्षेत्राच्या क्रांतीची माहिती देणा-या एका संग्रहालयाची उभारणी संस्थेच्या वतीने पुणे शहरात करण्याचा आमचा मानस आहे. ज्यामध्ये ५०० वर्षांचा मुद्रण कलेचा इतिहास, काळाप्रमाणे बदलत असलेले तंत्रज्ञान, आलेली स्थित्यंतरे, बदलत चाललेली मशिनरी, या विषयाशी संबंधित पुस्तके, छायाचित्रे, प्रदर्शनी यांचा समावेश यांचा समावेश असेल.

याशिवाय शास्त्री रस्त्यावर असलेल्या संस्थेच्या १० हजार स्केअर फूट जागेचे नुतनीकरण करीत त्या ठिकाणी एक ‘मुद्रण मॉल’ बनविण्याचे संस्थेचे स्वप्न आहे. या मुद्रण मॉलमध्ये मुद्रणाशी संबंधित सर्व वस्तुंची दालने असणार असून याचा फायदा मुद्रण व्यवसायिकाला एकाच छताखाली मुद्रणाशी संबंधित सर्व गोष्टी मिळण्यासाठी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.