Pune : दुकानदाराला पाच हजारांची खंडणी मागणारे तीन आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – दुकानदाराला पाच हजारांची खंडणी मागून पैसे न दिल्यास धमक्या देऊन मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे . हि घटना बुधवारी (दि. 26) सायंकाळी पाच ते आठच्या दरम्यान पर्वती परिसरात घडली.

अमित कैलास थोपटे (वय 30 रा. शिवशंकर सोसायटी, के के मार्केट मागे), निलेश मारुती निवंगुणे (वय 26, रा. अप्पर इंदिरानगर) गणेश बाळासाहेब निवगुणे (वय 36, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी पर्वती येथे राहणाऱ्या एका 48 वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पर्वती येथील दुकानात काम करत असताना अमित थोपटे आणि त्याचे साथीदार तेथे आले आणि त्यांनी फिर्यादीला ‘आपण जनता वसाहत मधील भाई आहे असे धमकावत त्याला आणि त्याच्या मित्रांना खर्चपाण्यासाठी हप्ता म्हणून पाच हजार रुपयांची खंडणी मागितली’.त्यावेळी फिर्यादीने खंडणी देण्यास नकार दिला. अमित थोपटे आणि त्याचे साथीदार रात्री हत्यारे घेऊन परत आले , आणि त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी आणि मुलांना मारण्याची धमकी दिली . आणि फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून खंडणी मागणार्‍यांना 3 हजार 700 रुपये दिले. त्यावरही न थांबत त्या तिघांनी उरलेले 1 हजार 300 रुपये देण्याचा तगादा लावला .

त्यामुळे फिर्यादी यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे अमित थोपटे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अमितसह त्याच्या आणखी दोन साथीदारांना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.