Purushottam Days Part 1: पुरुषोत्तम डेज भाग 1- प्रायोगिक एकांकिकेचे पारितोषिक विजेती ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’!

एमपीसी न्यूज कला संवाद (श्रीपाद शिंदे) –  महाराष्ट्र कलोपासक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने आतापर्यंत हजारो कलाकार रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला दिले आहेत. कला क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक महाविद्यालयांचे संघ जीवापाड मेहनत करतात. स्पर्धेपेक्षा स्पर्धेच्या तयारीचे दिवस म्हणजेच ‘पुरुषोत्तम डेज’ मधून कलाकार घडत जातो. यंदाच्या वर्षी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या चार संघानी ‘एमपीसी न्यूज कला संवाद’ या आमच्या व्यासपीठावर हजेरी लावली आणि ‘पुरुषोत्तम डेज’मधील आठवणींना उजाळा दिला. पाहूयात पहिल्या भागात प्रायोगिक एकांकिकेसाठी दिला जाणारा जयराम हर्डीकर करंडक पटकविणाऱ्या पुण्याच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘एव्हरी नाईट इन माय ड्रिम्स’ या एकांकिकेच्या संघाशी श्रीराम कुंटे यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा… 

————————————————-

जयराम हर्डीकर करंडक विजेती एकांकिका ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’!

‘एमपीसी न्यूज’ने नाट्य, कला क्षेत्रातील सर्वांना ‘एमपीसी न्यूज कला संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीला ‘पुरुषोत्तम डेज’ हे सदर सुरु केले असून या सदराचे तीन भाग असणार आहेत. पहिल्या भागात पुरुषोत्तम करंडक विजेते काशीबाई नवले महाविद्यालयाचे नाटक ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ या नाटकाच्या टीमशी संवाद साधला. नाटकाच्या निर्मितीपासून सादरीकरणापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी उलगडून सांगितला.

‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ या नाटकात 20-22 वर्षीय मुलाची कथा सांगितली आहे. नाटकातील मुलाला स्वप्न पडतात. त्यात त्याच्या मनातील प्रश्न, व्यथा आणि तरुणांच्या अस्वस्थतेचे दर्शन उत्तमरीत्या सादर करण्यात आले आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत पाटील याने केले आहे.

कोरोना काळात पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा बंद होती. दरम्यान या नाटकाचे लेखन झाले आहे. मात्र हे नाटक खास पुरुषोत्तमसाठी लिहिले गेले नव्हते. तर मला माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी जाणवल्या, त्याच मी कागदावर उतरवल्या आणि त्या नाटकाच्या माध्यमातून मांडल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये या नाटकाला बक्षीस देखील मिळाले, त्यामुळे आमची मांडणी योग्य होती, याची पावती मिळाली असल्याचे दिग्दर्शक हेमंत पाटील याने सांगितले.

हे नाटक लिहिण्यापासून सादर करण्यापर्यंत दिग्दर्शक म्हणून काही अडचणी आल्या. पण प्रत्येक पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हणत कोरोनामुळे तालमीला चांगला स्कोप मिळाल्याचे हेमंत म्हणाला. कॉलेज मधून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद देखील चांगला होता. सुमारे दीड महिना तालीम झाली. अनेक वेळेला डाव मोडून पुन्हा मांडला. त्यातून काही नवीन गोष्टी उलगडल्याचेही हेमंतने सांगितले.

तेजस रामदासी याने ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ या नाटकातील ‘ट्रुथ’ म्हणजेच ‘सत्य’ हे मुख्य पात्र साकारले आहे. पात्राबद्दल सांगताना तेजस म्हणाला, ‘आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात. खूप सारे परिवर्तन आपल्याकडून व्हायला हवे, असे वाटते. पण आपण तसे करत नाही. बदल घडवायचा असेल तर पाऊल उचलायला हवं, हे ट्रुथ पात्र नाटकात सांगून जाते.’

आपल्या कॉलेजकडून आपण पुरुषोत्तम करावं अशी प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याची इच्छा असते. पण प्रत्येकाला ही संधी मिळत नाही. मला पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा करायला मिळाली, हे माझं सुदैव आहे. या स्पर्धेत शिस्त अनुभवता आली. पुरुषोत्तम करंडक जीवनातले बारकावे वेचायला शिकवतो, असेही तेजस म्हणाला.

गणेश सोडमिसे याने ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ या नाटकात फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका केली आहे. ‘माझ्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व देवच सोडवेल. जिथं विज्ञान संपतं, तिथं देव सुरु होतो, असं मानणारा हा डिलिव्हरी बॉय आहे. नाटकाचा आशय समजून देणारं हे पात्र आहे. ‘तुम्ही पुण्यात आहात. तुम्हाला कला क्षेत्रात काम करायचंय तर पुरुषोत्तम करंडक ही उत्तम संधी आहे. अनेक मान्यवर कलाकारांनी या मंचावर काम केलं आहे. तिथं काम करायला मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचे गणेश सांगतो.

आशुतोष महामुनी याने ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ या नाटकाचे संगीत केले आहे. आशुतोष हा संगीत, गायन, हार्मोनियम यामध्ये विशारद आहे. त्याच्या या शिक्षणाचा नाटकाला फायदा झाला. अनेक भागांमध्ये असलेले नाटक एकसंघ करण्यासाठी चांगले संगीत महत्वाचे आहे. चांगले संगीत असलेली नाटके लोकांना भावतात, असे आशुतोष यांने सांगितले.

अजय पवार याने नाटकात लाईट्स आणि बॅकस्टेज केले आहे. तरुणांना रिलेट करणारे ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ हे नाटक आहे. तरुणांचे प्रश्न, सत्य मांडण्यासाठी नाटक हे प्रभावी मध्यम ठरेल, असा विश्वास देखील अजय याने यावेळी व्यक्त केला.

काशीबाई नवले महाविद्यालयाच्या ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ या नाटकाला सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक एकांकिका, जयराम हर्डीकर करंडक, अनंत नारायण पारितोषिक मिळाले आहे. तसेच हेमंत पाटील आणि गणेश सोडमिसे यांना अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देखील मिळाले आहे.

प्रत्येक बाबीचे सेन्सॉर झाले पाहिजे. कारण प्रत्येक लेखन, नाटक, चित्रपट यांचा समाजावर परिणाम पडतोच. आम्हाला देखील आमच्या ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स’ या नाटकातून सेन्सॉरने सांगितल्यामुळे एक-दोन गोष्टी काढाव्या लागल्या आणि आमचं नाटक स्पर्धेत पास झालं, अशा भावना टीमने व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.