Lonavala News : दोन पूर्णपणे सज्ज हाय इम्पॅक्ट रुग्णवाहिका आणि 800 स्ट्रेचर्स महाराष्ट्र महामार्ग पोलिसांना भेट

एमपीसी न्यूज – भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरलने सामाजिक असमानता दूर करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या यशलोक वेल्फेअर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेसोबत भागीदारी केली असून त्याद्वारे राज्य महामार्ग पोलीस विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या हायवे मृत्युंजय दूत योजनेला पाठिंबा दिला जाणार आहे. या भागीदारीद्वारे एसबीआय जनरल इन्शुरन्स दोन पूर्णपणे सुसज्ज हाय इम्पॅक्ट अँम्ब्युलन्स व 800 स्ट्रेचर्स दान केली जातील आणि त्यामुळे मुंबई- पुणे महामार्ग तसेच नाशिक महामार्गावरील अपघातातील बळींना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी आणि तसेच गोल्डन अवरमध्ये सुरक्षितपणे रुग्णालयात नेऊन त्यांना वेळेत उपचार देण्यासाठी फायदा होईल.

रस्त्यावरील अपघातांमध्ये लोक मुख्यत्वे वैद्यकीय मदत मिळण्यास किंवा त्यांना रुग्णालयात नेण्यास झालेल्या विलंबामुळे मृत्यूमुखी पडण्याची जास्त शक्यता असते असे दिसून आले आहे. वाहतूक व महामार्ग पोलिसांनी रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्यूंची संख्या कमी करण्याच्या हेतूने 1 मार्च 2021 रोजी ‘मृत्युंजय दूत’ योजना सुरू केली होती. या योजनेचा भाग म्हणून महामार्ग पोलिसांनी स्थानिक गावकरी, ढाबा व पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या आसपासच्या परिसरातील डॉक्टरांना चार ते पाच लोकांच्या समूहात नेमले आहे. या प्रशिक्षित मनुष्यबळाला स्ट्रेचर्स आणि प्रथमोपचार किट्स देण्यात आलेले आहेत आणि ते अपघातातील बळींना वैद्यकीय मदत तात्काळ पुरवू शकतात.

एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सी. कांडपाल म्हणाले की, “आमच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत रस्तासुरक्षा ही एक मुख्य लक्ष्याधारित बाब आहे. तात्काळ वैद्यकीय मदतीच्या कमतरतेमुळे दररोज रस्ता अपघातांमध्ये मृत्यूंची संख्या वाढताना पाहणे वेदनादायी आहे. एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून या समस्येवर काम करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महामार्ग पोलिसांसोबत भागीदारी केली आहे. जेणेकरून त्यांना मृत्युंजय दूत योजनेसाठी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा दिल्या जाऊ शकतील. या योगदानासह महाराष्ट्र हायवे पोलिसांच्या भागीदारीत आम्ही रस्ता प्रवासात प्रवाशांसाठी सुरक्षा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी देऊ इच्छितो.”

या उपक्रमाबरोबरच रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना एसबीआय जनरल इंडियन हेड इंजुरी फाऊंडेशन (आयएचआयएफ) लाही पाठिंबा देत आहे, जिथे अपघातातील रुग्णांना आवश्यक त्या उपचारांची मदत दिली जाते. एसबीआयने दान केलेल्या रुग्णवाहिकांचे फ्लॅग ऑफ एसबीआय जनरलचे एमडी आणि सीईओ पी.सी. कंदपाल, आयपीएस एडीजी महाराष्ट्र पोलीस ट्रॅफिक कुलवंत कुमार सरंगल आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.