Raigad news: कर्जत तालुक्यातील कुचकामी आरोग्य यंत्रणेमुळे जाताहेत जीव, आरोग्य यंत्रणा सुधारण्याची गरज – श्रीरंग बारणे

कोविड रुग्णांसाठी सुसज्ज हॉस्पिटल उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन

एमपीसी न्यूज – कर्जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने कोविडमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील कोविड उपाययोजना बद्दल माहिती घेण्यासाठी खासदार बारणे कर्जत येथे आले होते. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोविड रुग्णांकरिता सुसज्ज हॉस्पिटल असले पाहिजे आणि त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन खासदार बारणे यांनी बैठकीनंतर बोलताना दिले.

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आणि कोविड उपाययोजना याबाबत माहिती घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन कर्जत प्रांताधिकारी कार्यालयात केले होते.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलावलेल्या बैठकीला कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार, खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, कर्जत पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सी.  एस.  रजपूत, खोपोली नगरपरिषदचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये, खालापूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुरेखा भवांगे, नायब तहसीलदार मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  सी. के. मोरे-कर्जत, डॉ.  पी.  बी.  रोकडे- खालापूर, कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.  मनोज बनसोडे या प्रमुख अधिकारी वर्गासह कर्जत आणि माथेरान नगरपरिषदचे प्रतिनिधी, कर्जत तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

खासदार बारणे यांच्यासोबत युवासेनेचे रायगड जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी, नेरळ शिवसेनेचे शहरप्रमुख रोहिदास मोरे, कर्जत नगरपालिका नगरसेवक विवेक दांडेकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा, सदस्य प्रथमेश मोरे, नरेश निर्गुडा आदी उपस्थित होते.

कोविडचा आढावा देताना 2400 रुग्ण दोन्ही तालुक्यात होते. त्यात कर्जत तालुक्यात 70 तर खालापूर तालुक्यात 17 जणांचे मृत्यू झाले असून आजच्या स्थितीत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जेमतेम 200 आहे. कोविड काळात केल्या जात असलेल्या उपाययोजनामध्ये कर्जत नगरपरिषदकडून मास्क न वापरणे आणि सोशल डीसटन्स न पाळणे याबद्दल तब्बल 98 हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यावेळी खोपोली नगरपरिषदने केवळ 12 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे.

खोपोली सारख्या मोठ्या शहरात आता रुग्णांचे प्रमाण अल्प झाले असले तरी दंडात्मक कारवाईमध्ये कसूर करू नका, असे आवाहन खासदार बारणे केले. माथेरानमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू झाले असून त्या ठिकाणी पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र,  ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का हातावर असलेले रुग्ण देखील पर्यटक म्हणून आले असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

त्यामुळे माथेरान नगरपरिषदने आपल्या एन्ट्री पॉईंटवर सर्व पर्यटकांची व्यवस्थित तपासणी करण्याच्या सूचना खासदार बारणे यांनी यावेळी दिल्या. गणेशोत्सव काळात ग्रामीण भागात काळजी घेतली नाही म्हणून मागील काही दिवस कोविड रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे नवरात्र साध्या पध्दतीने साजरा करा, असे आवाहन शासनाने केले असल्याने कर्जत तालुक्यात हे सण साध्या पध्दतीने साजरे होण्यासाठी शासकीय यंत्रणेने काम करायला हवे, असे निर्देश खासदार बारणे यांनी दिले.

कर्जत तालुक्यात कोविड झालेल्या रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड असून कर्जत तालुक्यात आरोग्य यंत्रणा यास जबाबदार आहे. आपल्याकडे सुसज्ज कोविड रुग्णालय नाहीत आणि येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका देखील नाहीत. शासनाने 108 ची रुग्णवाहिका आणि सेवा खासगी संस्थेला दिल्या असल्याने त्या मिळविताना देखील तारांबळ उडत आहे. ही बाब कर्जत तालुक्यात कोविड रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येस कारणीभूत आहे.

त्यामुळे आपला प्रयत्न कर्जत तालुक्यातील उद्योग समूहाचा सीआरएस फंडामधून चांगली आरोग्य यंत्रणा उभी करता येईल काय ?, यासाठी राहणार आहे.त्याचवेळी कर्जत तालुक्यात एकही शववाहिनी नाही ही बाब देखील चुकीची असून रुग्णवाहिकावर काम करणारे चालक यांची मनोवृत्ती चुकीची असून याविरोधात जनता उठाव करेल. त्याआधी आरोग्य यंत्रणेने आपली बाजू सावरली पाहिजे, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

शासनाचे प्रयत्न आहेत, पण कर्जत तालुक्यात यंत्रणा कमी पडते ही बाब चुकीची असून परिस्थितीवर मात करण्याचे काम प्रशासन करीत आहे. पण जाणारे जीव वाचवले तर आपल्याला लोकप्रतिनिधी असण्याचा आणि तुम्ही प्रशासन असण्याबद्दल स्वतःला धन्य वाटेल असे काम व्हायला हवे, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

  माझे कुटुंब-माझी जबाबदारी योजना जनतेच्या फायद्याची !

शासनाने माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी ही योजना आणली असून कोविड काळात सर्वात चांगली अशी ही योजना आहे.त्यात घरोघरी जाऊन आरोग्य यंत्रणा सर्वांची तपासणी करीत आहे. त्यामुळे त्या सर्वेक्षणाचा फायदा सरकारला होईल आणि कोणत्याही आजाराची माहिती मिळू शकणार आहे.

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आरोग्य विभाग, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्या अनेक टीम कार्यरत असून योजना सुरू झाल्यापासून 15 दिवसात तब्बल 1 लाख 42 हजार लोकांची तपासणी घरोघरी जाऊन केली आहे.

त्यात केवळ 2 कोविड रुग्ण आढळून आले आहेत. 25ऑक्टोबर पर्यंत 100 टक्के सर्वेक्षण झाले पाहिजे, अशी सूचना खासदार बारणे यांनी अधिकारी वर्गाला केली. भविष्यात कोरोना मुळे कोणाचे मृत्यू होऊ नयेत आणि बाधित रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी ही योजना महत्वाची आहे.

त्यामुळे थेट आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेता येईल आणि म्हणून सर्वांनी आपला सहभाग नोंदविला पाहिजे.त्यात सुरुवातीला शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांचा विरोध होता. परंतु, त्या सर्वांनी सर्वेक्षणाचे काम आघाडीवर राहून सुरू केले आहे याचा आपल्याला निश्चित आनंद आहे आणि म्हणून मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी

दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी आपण यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.  राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. या विषयावर आपण शनिवारी पनवेल येथे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्याचवेळी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या सोबत बोलणे झाले.

पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांची शासनाने चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण झाली असेल तर काय कारवाई करणार हे जाहीर करावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.