Pimpri : खासदार श्रीरंग बारणे यांनी जाणून घेतल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या 

एमपीसी न्यूूज – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी  चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला. प्रवाशांच्या समस्या मार्गी लावल्या जातील. रेल्वे वेळेत सोडण्याबाबत संबंधित अधिका-यांशी चर्चा केली जाईल, असे बारणे यांनी सांगितले.

चिंचवड प्रवासी संघटनेच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते खंडेनवमीनिमित्त बुधवारी (दि.17)रेल्वेत देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर खासदार बारणे यांनी सिंहगड एक्सप्रेसने चिंचवडपासून  लोणावळ्यापर्यंत प्रवास केला. शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे,  रेल्वे समितीचे सदस्य बशीर सुतार, उद्योजक रवी नामदे यावेळी उपस्थित होते. यावेळी बारणे यांनी विजया दशमीच्या रेल्वे प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.

रेल्वे वेळेत सुटत नाही. लोणावळा ते पुणे लोकलच्या वारंवार फे-या रद्द केल्या जातात. त्यामुळे कार्यालय, इस्छितस्थळी पोहचण्यासाठी विलंब होतो. प्रवाशांची संख्या अधिक असून रेल्वेचे डबे कमी आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा प्रवाशांची संख्या अधिक असते. लोंबकळत प्रवास करावा लागतो. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यासाठी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान तीन लोकल सोडाव्यात. तसेच महिलांच्या डब्यात पुरुषांकडून घुसखोरी केली जात आहे. सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे पोलिसाची नेमणूक करण्यात यावी, अशा मागण्या रेल्वे प्रवाशांनी केल्या.

त्यावर खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “रेल्वे वेळेत सुटली पाहिजे. वारंवार फे-या रद्द होऊ नयेत. याबाबत रेल्वेच्या संबंधित अधिका-यांशी चर्चा केली जाईल. रेल्वेचे डबे वाढविणे. लोकलच्या फे-या वाढविण्याबाबत रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा सुरु आहे. सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त केला जाईल. याबाबत रेल्वे पोलिसांशी चर्चा करुन  रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात पोलिसाची नेमणूक करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.