Pune News : तिन्ही दलांच्या सैनिकांसमवेत राखीपौर्णिमा; पुण्यातील 5 लायन्स क्लबचा एकत्रित उपक्रम

एमपीसी न्यूज – सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून देशातील नागरिकांचे रक्षण करत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते देशाचे बांधव आहेत. ही भावना जपत पुण्यातील पाच लायन्स क्लबच्या वतीने भूदल, वायूदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या सैनिकांसमवेत राखी पौर्णिमा साजरी केली.

पुण्यातील लायन्स क्लबच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील एनसीसी मुख्यालयात सैनिकांसमवेत राखीपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ब्रिगेडीयर सुनील लिमये, कर्नल जस्मीत सिंग बाली, कर्नल अनुराग सूद, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर हेमंत नाईक, श्याम खंडेलवाल, रिजन चेअरपर्सन दीपक लोया, रितू नाईक, झोनल चेअरपर्सन सतीश सांडभोर, क्लबचे अध्यक्ष रामेश्वर लाहोटी, किशोर बागमर, उपेन्द्र कौल, झोन सेक्रेटरी प्रसन्न पाटील, अलका डोंगरे या वेळी उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ पुणे अशोकनगर गोल्ड, लायन्स क्लब ऑफ पुणे सेन्ट्रल, लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस, लायन्स क्लब ऑफ पुणे नांदे, लायन्स क्लब ऑफ पुणे मनस्वी आदी लायन्सचे क्लब उपक्रमात सहभागी झाले होते.

ब्रिगेडीयर सुनील लिमये म्हणाले की, हवाई दल, भूदल, आणि वायूदलाचे सैनिक या ठिकाणी एकत्रित रक्षाबंधन साजरा करत आहेत. भारताची विविधतेतील एकता यामधून दिसून येते. अशा उपक्रमांमधून सैनिकांचे मनोबल उंचावते. सैनिक नेहमीच चांगली कामगिरी करत असतात. यापुढेही ते चांगली कामगिरी करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.