Kartiki yatra:जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये देवस्थान कमिटीच्या वतीने कार्तिकी यात्रेच्या नियोजनासंदर्भातील आढावा घेण्यात आला

एमपीसी न्युज : शुक्रवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आगामी कार्तिकी यात्रेच्या नियोजनासंदर्भात झालेल्या सभेत देवस्थान कमिटीच्या वतीने यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (कार्तिकी यात्रा) दिनांक 16 नोव्हेंबर ते दिनांक 23 नोव्हेंबर (8दिवस) या कालावधीत संपन्न होणार आहे. दिनांक 14 नोव्हेंबर कार्तिकी वद्य षष्ठी पासून वारकरी येण्यास सुरुवात होईल. दिनांक 16 नोव्हेंबर रोजी श्री संत नामदेवरायांच्या पालखी सोहळा आळंदीमध्ये दाखल होईल.

करोना निर्बंधमुक्त पहिलीच वारी असल्याने यावर्षी 10 ते 12 लाख वारकरी, भाविक यात्राकाळात आळंदीत येण्याची शक्यता आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी कार्तिकी वद्य एकादशी मुख्य पूजा होणार आहे. एकादशीचे दिवशी पहाटपूजेसाठी निमंत्रितांना दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वा.हनुमान दरवाज्यातून मंदिरात प्रवेश देण्यात येईल.तसेच दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 ते 3 व दुपारी 2 ते 6 या वेळेत पासधारकांना हरिहरेंद्र स्वामी मठाजवळील जिन्यावरुन मंदिरात प्रवेश देण्यात येईल. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. विशेष निमंत्रित पासधारक व पारंपरिक मानाच्या सेवांसाठी पासधारकांना हरिहरेंद्र मठाजवळील बारीतून मंदिरात प्रवेश दिला जातो. यावेळी सदर प्रवेशद्वारावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी तैनात असतील.

सदर भाविकांना मंदिर प्रवेशासाठी संस्थानचे मानकरी अथवा संस्थानचे सेवक या ठिकाणावरील पोलीस कर्मचारी यांचेशी संपर्क करावा लागेल. प्रतिवर्षी इंद्रायणी नदी पलीकडील वैतागेश्वर मंदिरामागील दर्शनमंडपासाठी आरक्षित जागेत दर्शनमंडप उभारून भाविकांचे दर्शनबारीची व्यवस्था करण्यात येत होती. या वर्षाकरिता दर्शनमंडपासाठी जागा उपलब्ध करून मिळावी.सदर दर्शनरांग मंडपापासून नवीन पुलाचे रस्त्याने एस. टी. स्टँड पर्यंत तेथून जुन्या पुलावरून आळंदी शहराकडे वळवण्यात येते.दर्शनमंडपातील भाविक भक्तीसोपान पुलावरून नवीन दर्शनबारी इमारत /पाण दरवाजामार्गाने (आळीपाळीने किंवा भाविकांच्या गर्दीनुसार )मंदिरात प्रवेश करतील.

इंद्रायणी तीरावर दत्तघाटावर महापूजा पासधारकांसाठी मंडप उभारण्यात येणार आहे. सदर पुजाधारक पहाटे पासून ते सकाळी 11 पर्यंत पाणदरवाजामधून मंदिरात प्रवेश करतील. महाद्वारात बॅरिकेटस लावून बंद करण्यात येईल. भाविक महाद्वारातून बाहेर पडतील.याठिकाणीही स्थानिक पोलीस कर्मचारी नियुक्त असावा. मंदिर,दर्शनबारी मंडप इत्यादी ठिकाणी लाईट गेल्यास तात्काळ जनरेटरद्वारे विद्युत व्यवस्था करण्यात येईल.भाविकांना पिण्याचे पाणी मंदिर ,दर्शनमंडपात उपलब्ध करून देण्यात येईल. दर्शनबारीत व मंदिरात स्वयंसेवी संस्था व ग्रामीण रुग्णालय,आळंदी यांच्या मदतीने आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात. भाविकांना एलईडी स्क्रीनद्वारे दर्शनमंडपात दोन ठिकाणी श्रींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. संस्थान कमिटीने ,मंदिर मंदिर परिसर, दर्शनमंडप या ठिकाणी कायमस्वरूपी सी .सी. टी .व्ही. कॅमेरे बसविले आहेत.

यात्राकाळात इंद्रायणी पलीकडील दर्शनमंडपातही कॅमेरे बसविण्यात येतील. मंदिरासाठी प्रतिवर्षाप्रमाणे पोलिस बंदोबस्त मिळावा. संस्थान मार्फत आळंदी शहरात 100 शौचालये यात्राकालावधीसाठी बसविण्यात येणार आहे. त्याकरिता जागा व पाणी नगरपरिषद उपलब्ध करून देते. ज्या दिंड्यांची ,वारकऱ्यांची आळंदी शहरात राहण्याची गैरसोय होत आहे, अशा दिंड्या व वारकऱ्यांकरिता देवस्थानने 435 एकर जागेत उतरण्याची व्यवस्था करता येईल. त्याठिकाणी आपणा प्रशासनाकडून पिण्याचे पाणी ,शौचालये,लाईट व्यवस्था व्हावी, याबाबतची माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.