Pimpri : रोझलँड सोसायटीने घालून दिला ‘पाणी बचती’चा आदर्श (व्हिडिओ)

रोझलँड सोसायटीचे पदाधिकारी ‘एमपीसी न्यूज कट्ट्या’वर  
 
एमपीसी न्यूज – शहरांमध्ये वाढत्या नागरिकरणांमुळे दिवसेंदिवस पाणी टंचाई, विस्कळित पाणीपुरवठा या सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या व भविष्यातील पाण्याची गरज ओळखून एक सोसायटी स्वत:साठी स्वत:च पाणी उपलब्ध करू शकते. हेच  रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर  मर्यादित वापर आणि प्रत्येक घरातील गळती बंद करून रोझलॅड सोसायटीने दाखवून दिेले आणि ‘पाणी बचती’चा एक आदर्श शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना घालून दिला, असे मत रोझलॅड सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर यांनी मांडले.  
 
पिंपळे सौदागर येथील रोझलॅड सोसायटीने पाणी, घनकचरा व्यवस्थान व इतर पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरित्या राबविले. त्यासाठी सोसायटीचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. या रोझलँड सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर व सचिव आनंद दफ्तरदार हे आज (शनिवारी) ‘एमपीसी न्यूज कट्ट्या’वर आले होते. 
 
त्यावेळी पाणी टंचाईची समस्या व त्यावर केलेल्या उपायांबद्दल संतोष म्हसकर म्हणाले की, रोझलॅड सोसायटीमध्ये एकूण 35 इमारती असून सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या आहे. 2006 पासून या सोसायटीमध्ये रहिवाशी राहतात. पिंपळे सौदागर भागात सुरुवातीला कमी लोकसंख्या असताना पाणी, कच-याची समस्या कुणालाही जाणवत नव्हती. परंतु, हळूहळू या भागातील नागरिकरणात भर पडल्यानंतर पाणीटंचाई जाणवू लागली. त्यावर टॅंकरचा पर्याय होता, परंतु तो सोसायटीच्या दृष्टीने अधिक खर्चिक होता. तो परवडणारा नसल्याने आम्ही इतर माहिती घेतली. 

 
आम्हाला इंटरनेट, जाणकारांकडून रेनवॉटर हार्वेस्टिंगची माहिती मिळाली. त्यासाठी पारनेर तालुक्यातील हिवरे बाजार या गावी भेटही दिली. नंतर 2008 पासून सोसायटीत तीन बोअरवेलचा वापर करून रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू करण्यात आले. सध्या 22 बोअरवेल सोसायटीत असून एकही टॅकर आम्हाला मागवावे लागत नाही. पाणीबचतीसाठी दुसरा पर्याय म्हणून नळावाटे मर्यादित पाणी वापरासाठी प्रयत्न केले. पुढे प्रत्येक घरातील गळती शोधून ती बंद करण्यावर भर दिला. त्यातून सोसायटीची 25 टक्के पाणीबचत होऊ शकली आहे. या प्रकारे नागरिकांकडून गळती कमी करून देखील सोसायट्या मोठ्या प्रमाणात पाणी वाचवू शकतात. 
 
वापराच्या पाण्यासाठी 30 हजार लिटरची  टाकी व पिण्यासाठी 4 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. पिण्यासाठी सकाळी व संध्याकाळी 15 मिनिटे फक्त महापालिकेचे पाणी वापरतो. इतर वेळी रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या पाण्याचा वापर करतो. किती पाणीटंचाई असेल, तरी रोझलॅडमध्ये 24 तास 7 दिवस पाणीपुरवठा उपलब्ध असतो. मोठी सोसायटी असताना अतिशय कमी पाणीपट्टी पालिकेला येत असून 40 ते 45 टक्के पाणीपट्टी या प्रकल्पामुळे कमी झाली आहे. अनेक सोसायट्यांचे लाखो रुपये महिन्याला टॅकरसाठी खर्च केले जातात. याची जनजागृती आम्ही सोसायट्यांमध्ये केली. त्यालाही चांगला  प्रतिसाद पाहायला मिळाला असून पिंपळे सौदागरमधील अनेक सोसायट्या टँकरमुक्त  झाल्या आहेत. पाण्याची समस्या या भागात सोडविण्यामध्ये योगदान दिल्याचा आम्हाला आनंद आहे. यापुढे देखील आम्ही थांबणार नसून यासाठीचे वेगवेगेळे प्रयत्न सुरू ठेवणार आहोत. 
 
सोसायट्यांमधील रहिवाश्यांच्या सहकार्य व प्रतिसादाबद्दल सांगताना ते म्हणाले की, हा उपक्रम सुरू करताना काही अडथळे आले. परंतु, शहराची लोकसंख्या, पाण्याची उपलब्धता आणि टंचाई याची माहिती घेऊन ती सदस्यापुढे ठेवली. त्यावर वादविवाद झाले, चर्चा झाली. नंतर एक वर्ष हा प्रकल्प रखडला. परंतु, एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर  सकारात्मक सदस्यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प सुरू केला. तरीही 60 टक्के लोकांना हे समजून देवू शकलो. त्यानंतर हळू हळू ही गरज सर्वांच्यच लक्षात आली असून सर्वांचे सहकार्य मिळते आहे.  
 
सोसायट्यांना हे प्रकल्प राबवित असताना खर्चांची बाजू सांगताना म्हसकर म्हणाले की,  रेनवॉटर हार्वेस्टिंग करताना पाण्याच्या टाक्या करून किंवा बोअरवेलचा वापर केला जाऊ शकतो. या पर्यायांपैकी आम्ही बोअरवेल रेनवॉटर हार्वेस्टिंग  किफायतशीर व फायदेशीर असल्याचे लक्षात आले. ते इतरांनाही पटवून देण्यात आम्हाला यश मिळाले. एका बोरवेलसाठी आम्हाला 60 हजार रुपयांचा खर्च लागला. परंतु, तोही इमारतीपासून बोअरवेलचे अंतर अधिक असल्याने जास्त होता. इमारतीजवळ बोअरवेल असल्यास या पेक्षाही कमी खर्चात हा प्रकल्प राबविणे शक्य असल्याचे म्हसकर म्हणाले. सदस्यांपासून सोसायटीत काम करणा-यांना आम्ही पाणी व पाणी बचत ही संकल्पना वेळोवेळी समजावून दिली. त्याचे परिणाम आज दिसत असून इतर सोसायट्यांनी याचा अवलंब केल्यास निश्चित पाणी समस्येवर मात करणे शक्य असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.