Sangvi : सात दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सांगवीकरांसह प्रशासन सज्ज

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरात सात दिवसांचा गणपती असतो. यंदाच्या गणेश उत्सवाचा आज (बुधवारी) सातवा दिवस आहे. त्यामुळे सांगवी आणि परिसरातील गणपती बाप्पांना आज भक्तिभावाने निरोप देण्यात येणार आहे. बाप्पांना निरोप देण्यासाठी सांगवीकर, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग सज्ज झाला. प्रत्येकाने विसर्जनासाठी चोख तयारी केली आहे.

सांगवी पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सांगवी पोलीस ठाण्यात एकूण 156 गणेश मंडळांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त अन्य लहान मंडळे देखील आहेत. आज सर्व गणेश मंडळे विसर्जन करणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन घाटांवर पोलिसांनी 5 पोलीस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 150 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवला आहे.

रात्री 12 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरु राहणार आहे. त्यामुळे 12 वाजेपर्यंत वाद्ये वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान विसर्जन मिरवणुकीदरम्यान परिसरात ध्वनी प्रदूषण होऊ नये. मोठ्या आवाजांचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सांगवी पोलिसांचे ध्वनी प्रदूषण पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक ध्वनी प्रदूषण न होण्यासाठी तत्पर राहणार आहे. एखाद्या मंडळाच्या मिरवणुकीत जास्त आवाज होत असेल तर त्या मंडळांना तात्काळ हे पथक सूचना देखील देणार आहे.

अग्निशमन विभागाने देखील विसर्जन घाटांवर चोख तयारी केली आहे. सांगवीसह पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 26 विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. सांगवी परिसरातील पवना नदीवरील सांगवी स्मशान घाट, दशक्रिया विधी घाट, वेताळबाबा मंदिर घाट, पिंपळे गुरव घाट, काटे पिंपळे घाट क्रमांक एक आणि मुठा नदीवरील पिंपळे निलख घाट या घाटांवर पथके तैनेत केली आहेत. पथकांमध्ये लिडिंग फायरमन, फायरमन यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत दोन लाईफ जॅकेट, दोन लाईफरिंग, दोर, गळ असे अत्यावश्यक साहित्य देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.