Sangvi : बीड जिल्ह्यातील सराईत फरार आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील सराईत फरार आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सापळा रचून पकडले. या कारवाईमुळे परळी शहर पोलीस ठाण्यातील दोन, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील चार आणि युसूफ वडगाव पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 26) पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात करण्यात आली.

ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गिट्टे (वय 29, रा. नंदागोळ, ता. परळी, जि. बीड) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांना माहिती मिळाली की, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील फरार आरोपी पिंपळे निलख परिसरात फिरत आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांनी विशालनगर, पिंपळे निलख परिसरातील हॉटेल तेहेलका जवळ सापळा रचला. पोलिसांनी हॉटेल तेहेलका येथे एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे त्याने सांगितले. त्यापैकी एका गुन्ह्यात तो मागील दहा वर्षांपासून फरार होता. बीड पोलीस दल मागील दहा वर्षांपासून त्याच्या शोधात होते. आरोपी ज्ञानोबा याच्या विरोधात परळी येथे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई सुरु आहे. सांगवी पोलिसांनी ज्ञानोबा याला अटक करून पुढील कारवाईसाठी परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, पोलीस कर्मचारी भालेराव, दांगडे, केंगले, बो-हाडे, भोजने, गारडे, पिसे, विनायक देवकर, नरळे, खोपकर, फल्ले, अनिल देवकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.