Pune News : ॲक्सिस बँकेने करार न पाळल्याने सातारा महामार्ग रखडला ; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट

एमपीसी न्यूज : पुणे- बंगळुरू महामार्गावरील सातारा हद्दीतील  उड्डाणपुलांचे काम रखडले हे सत्य आहे. ॲक्सिस बँकेने करार न पाळल्यामुळे महामार्ग रखडल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात केला.

चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री गडकरी यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, पुणे -बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा महामार्गावरील चार उड्डाणपूल तयार केले जात आहेत. एक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.

खरेतर सातारा महामार्ग रखडण्याला ॲक्सिस बँक जबाबदार आहे. कारण रिलायंस इन्फ्रा आणि ठेकेदारांनी कर्ज काढले होते. त्याचा हप्ता थेट ॲक्सिस बँकेच्या खात्यात जमा होत होता.

संबंधित कंपन्यांना ॲक्सिस बँकेने ते पैसे न दिल्यामुळे कामे रखडल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे ‘एनएचआयए’च्या खात्यातून कंपन्यांना पैसे दिले होते ते आम्ही टोलच्या रुपाने परत घेणार आहोत.

दरम्यान, चांगले रस्ते सेवा हवी असेल तर टोल भरावाच लागेल. राज्यात सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी टोलमाफी दिली होती. मात्र, अजून त्या कंपन्यांना पैसे मिळालेले नाहीत. परंतु, आम्ही टोल माफी देणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल. कात्रज घाटातील नवले उड्डाणपुलाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. रात्रं -दिवस काम करून उड्डाणपुलांचे काम पूर्ण केले जाईल. नागरिकांना आणखी काही वर्ष वाहतुककोंडीचा त्रास होऊ शकतो, त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.