Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 16 – वुर्केरी वेंकटरामन

एमपीसी न्यूज : त्याला ‘भारताचा डेव्हिड गॉवर’ म्हणून (Shapit Gandharva) ओळखले जायचे. डावखुऱ्या फलंदाजाकडे असलेली सौंदर्यपूर्ण फलंदाजी त्याचे बलस्थान होते. त्याला भारतीय क्रिकेट संघात 23 व्या वर्षीच स्थान मिळाले. पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडीज सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना त्याने दुसऱ्या डावात 83 धावांची आकर्षक खेळी करून सर्वांनाच प्रभावित केले होते; मात्र त्याला त्या सर्व अपेक्षांची पूर्तता करता आली नाही, ज्या त्याच्याकडून सर्वांनाच होत्या. अन् अवघ्या 11 कसोटी खेळून त्याची कसोटी कारकीर्द संपुष्टात आली वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी!

‘महाभारत’ या तमाम भारतीयांसाठी श्रद्धास्थान असलेल्या पौराणिक कथेमध्ये ‘कर्ण’ नावाचा एक अतिशय शूर योद्धा असतो. त्याला परमेश्वराने जन्मजात अभेद्य अशी कवचकुंडले दिलेली असतात. त्याने परशुरामाकडे धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेतलेले असते. पण ते घेताना त्याने एक गुन्हा केलेला असतो. त्यामुळे त्याला युध्दकलेबरोबरच एक शाप मिळतो- रणांगणात युद्धाच्या ऐन वेळी त्याला त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचा विसर पडेल असा. असेच काहीसे रामनबरोबर झाले असावे. त्याची फलंदाजी अतिशय देखणी होती. त्याच्या फटक्यांच्या भात्यात आक्रमक, बचाव, सौंदर्य सर्व काही मुबलक होते. रणजी स्पर्धेत त्याने रुसी मोदी यांचा 40 वर्षे जुना विक्रम नेस्तनाबूत करून सर्वांना आपल्या आगमनाची नांदी दिली होती. नशीब सुद्धा त्याच्या सोबत होतेच. त्यामुळे त्याला लवकरच भारतीय संघात स्थानही मिळाले; पण तिथे मात्र त्याला आपले नाणे खणखणीत वाजवता आले नाही. कदाचित म्हणूनच त्याची कारकीर्द अतिशय लवकर संपुष्टात आली.
23 मे 1965 साली त्याचा जन्म मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला. त्याला बालपणापासूनच क्रिकेटचे अतिशय आकर्षण होते. तामिळनाडूचे अनेक खेळाडू देशासाठी खेळलेले आहेत.

रामनचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू झाली. तुम्हाला गंमत वाटेल, पण त्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘डावखुरा मंदगती ऑफस्पिन गोलंदाज’ म्हणून खेळायला सुरुवात केली होती. मात्र त्याची फलंदाजी जास्त उपयुक्त ठरली. मधल्या फळीत खेळताना त्याने 1988-89 मध्ये रणजी मोसमात 1 हजार 18 धावा करून रुसी मोदी यांनी 1944-45 साली केलेला विक्रम मोडला. यात त्याने दोन द्विशतकं आणि गोव्याविरुद्ध एक त्रिशतक करून सर्वांनाच प्रभावित केले. या दमदार खेळीची दखल निवड समितीने घेतली आणि दिलीप वेंगसरकरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्धच्या 1988 -89 सालच्या तीन कसोटी सामन्यांसाठी त्याची संघात निवड झाली.

पहिल्या दोन कसोटीत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही; मात्र चेन्नई येथे सुरू झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार दिलीप वेंगसरकर जायबंदी झाल्याने त्याला कर्णधार रवी शास्त्रीने अंतिम 11 त स्थान दिले. ही तीच कसोटी,जी नरेंद्र हिरवानीने ऐतिहासिक कामगिरी करून आपल्या नावावर केली होती. पहिल्या डावात रामनला विशेष काही करता आले नसले, तरी दुसऱ्या डावात त्याने अतिशय आकर्षक खेळत 83 धावांची मौल्यवान खेळी केली. पदार्पणातच शतक पूर्ण करणार असे वाटत असताना तो 83 धावांवर पायचित झाला; पण त्याने केलेल्या या खेळीमुळेच भारतीय संघाला विंडीजविरुद्ध चांगली आणि मजबूत आघाडी मिळाली. रामनच्या या खेळीने अनेकांना तो डेव्हिड गॉवर सारखा खेळत असल्यासारखे वाटले. मात्र दुर्दैवाने रामनला आपल्या नैसर्गिक गुणवत्तेला न्याय देता आला नाही.

त्याचे संघात स्थान पक्के झाले नाही. कधी त्याला मधल्या फळीत खेळवले, तर कधी सलामीला पाठवले गेले. वेंगसरकरनंतर कर्णधार झालेल्या मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघात त्याला न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी दौऱ्यात स्थान मिळाले; पण त्याला त्याच्या नेहमीच्या जागेवर न खेळवता सलामीला पाठवण्यात आले. कधी अजय जडेजा, कधी मनोज प्रभाकरसोबत त्याने डावाची सुरुवात केली; पण विदेशातल्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर त्याला स्वतःला सिद्ध करण्यात फारसे यश आले नाही. तरीही त्याच्या नावावर एक विक्रम आजही अबाधित आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याच विरुध्द शतक झळकावून भारतीय संघाला विजयी केले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. कामगिरीत सातत्य न ठेवता आल्याने आणि संघात नियमित जागा न मिळाल्याने वा मिळालेल्या जागा न टिकवता आल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्द फक्त 11 कसोटीत समाप्त झाली. अन् दुर्दैव बघा! या अकरा कसोट्या तो 8 वर्षांत खेळला. त्यातही खास बाब म्हणजे यातले अधिकाधिक सामने तो भारताबाहेर खेळला. त्याचे दुर्दैव असे की त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाने 25 कसोटी सामने खेळले,ज्यातल्या फक्त 11 सामन्यांत त्याला संधी मिळाली. यातही त्याला आपल्या मायदेशी फक्त एकच कसोटी सामना खेळायला मिळाला. त्याने एकूण 11 कसोटीत चार अर्धशतकांसह 448 धावा केल्या, ज्यातल्या सर्वोच्च होत्या 96, तर त्याने 27 एकदिवसीय सामने खेळून एक शतक आणि तीन (Shapit Gandharva) अर्धशतकांसह 617 धावा केल्या.

Melodies of Asha Bhosale Quiz 5 Result : ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पाचव्या दिवसाचे ‘हे’ आहेत विजेते!

त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना आपल्या पहिल्याच षटकात विकेट मिळवण्याचा विक्रमही केला होता; मात्र त्याला पुढे फारशी गोलंदाजी करायला मिळाली नाही. त्याच्या नावावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी दोन बळी आहेत. त्याने 132 प्रथम श्रेणी सामन्यात तब्बल 7 हजार 939 धावा काढल्या, ज्यात 19 शतके आणि 38 अर्धशतकेआहेत. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 312 आहे, तर त्याने गोलंदाजीत 85 विकेट्स आपल्या नावावर नोंदवलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संघातले स्थान एकदा गमावल्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्याचा फॉर्मही गेला. त्याला त्याचे रणजी संघातले स्थानही गमवावे लागले. त्यानंतर त्याने 1999 साली आपली निवृत्ती जाहीर केली.

खरे तर त्याला भारतात जास्त खेळायला मिळाले नाही. म्हणून त्याला आपला सर्वोत्तम खेळ दाखवता आला नाही, असे म्हणणे अजिबात रास्त ठरणार नाही. तुम्हाला कुठेही खेळता आलेच पाहिजे. भारतीय क्रिकेटचे एक अतिशय मोठे नाव असलेल्या आणि जगात आपल्या नावाची कीर्ती अजरामर करणाऱ्या लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी तर आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवातच विंडीज विरुद्ध विंडीजमध्ये करून आपल्या कारकिर्दीचा यशस्वी श्रीगणेशा केला होता. त्यामुळे रामनच्या बाबतीत असे म्हणणे बिलकुल न्याय्य ठरणार नाही. पण तरीही हे नक्कीच की त्याला मायदेशात कदाचित आणखी काही सामने खेळायला मिळाले असते, तर त्याची कारकीर्द अशी अकाली नक्कीच मावळली नसती. पण क्रिकेटमध्ये जर-तरला काहीही अर्थ नसतो हेच खरे. रामनला आपल्यातल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही, हे नाईलाजाने का होईना म्हणावे वाटते.

रामनने निवृत्तीनंतर आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात (Shapit Gandharva) करताना समालोचन आणि आता कोचिंगला सुरुवात केली आहे. त्याने भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य मार्गदर्शक म्हणून राजेश पोवारच्या गच्छंतीनंतर कार्यकाल पूर्ण केला आहे. त्याचे उर्वरित आयुष्य सुख-समृद्धीचे आणि आनंदाचे जावो आणि त्याच्या मार्गदर्शनातून भारतीय क्रिकेटक्षेत्राला उच्च दर्जाचे आणि भारतीय क्रिकेटचे वैभव वाढवणारे क्रिकेटपटू मिळोत, इतकीच अपेक्षा.

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.