Shapit Gandharva : शापित गंधर्व : लेख 41 वा – पार्थिव पटेल

एमपीसी न्यूज : त्याच्याकडे नैसर्गिक प्रतिभा होती. परमेश्वराने त्याला ती उपजतच दिली होती. त्याला अतिशय योग्य वेळी संधीही मिळाली. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळताना भारतीय संघ संकटात असताना त्याने दडपणाखाली एक जबरदस्त खेळी करुन संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले, (Shapit Gandharva) तेव्हा कर्णधार गांगुलीपासून ते मोठमोठ्या समीक्षकांनी त्याचे केलेले कौतुक बघून, त्याची ती खेळी बघून असे वाटले होते की तो भारतासाठी खूप वर्षे खेळून आपल्या प्रतिभेला न्याय देईल. पण…

MPC News Special : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहू ते कासारवाडी दरम्यान फुटका मणीही चोरीला गेला नाही
दुर्दैवाने त्याला तसे काहीही करता आले नाही. तो जितक्या लवकर यशाची शिखरे चढला;तितक्याच लवकर खालीही आला. पार्थिव पटेल उर्फ भारताचा वंडरबॉय म्हणून वयाच्या 18व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करून हनिफ मोहम्मद यांचा 1952 पासूनचा अबाधित असलेला विक्रम आपल्या नावावर करणारा पार्थिव पटेल ‘लंबी रेस का घोडा’ का ठरू शकला नाही, याचे उत्तर खरेच आपल्याला कधीच मिळत नाही.

9  मार्च 1985 साली गुजरातमधल्या अहमदाबाद येथे जन्मलेल्या पार्थिव पटेलच्या घरातले वातावरण तसे बऱ्यापैकी सुखवस्तू होते. टिपिकल गुजराती लोकांसारखे त्याला व्यवसायात पडायचे नव्हते. त्याला आपले करियर क्रिकेटमधे आणि क्रिकेटमध्येच करायचे होते. विशेष बाब म्हणजे त्याच्या घरच्यांनीही त्याला विरोध न करता त्याची आवड मनापासून स्वीकारली. वयाच्या 11व्या वर्षांपासूनच त्याने शालेय क्रिकेटमधे स्वतःच्या नावाची कीर्ती वाढवायला सुरुवात केली. त्याच्यावर ऍडम गिलख्रिस्ट आणि इयांन हिली या ऑस्ट्रेलियन विकेटकिपरचा प्रभाव होता. दोनच वर्षात त्याची निवड गुजरात संघाच्या 14 वर्षाखालील संघात झाली.

पुढील दोन वर्षात तो गुजरात संघाच्या 16 वर्षांखालील संघाचा अविभाज्य घटक बनला. 2000 साली महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना गुजरात संघाला फॉलोऑन मिळाला, तेव्हा त्याने त्या सामन्यातल्या दोन्हीही डावात शतक आणि द्विशतक करून आपला दमखम दाखवला. पहिल्या डावात त्याने 101 तर दुसऱ्या डावात केवळ 297 चेंडूत 210 धावा करून शानदार योगदान दिले. यानंतर त्याच्यासाठी मोठ्या संधीचे दालन उघडे झाले.19 वर्षाखालील पश्चिम विभागाच्या संघाचा तो कर्णधार झाला, तर इंग्लंड संघाविरुद्धच्या 19 वर्षाखालील संघाचे त्याने नेतृत्वही केले. अहमदाबादच्या विद्यानगर हायस्कूलमध्ये शिकत असताना त्याने भारताचा महान गोलंदाज रॉजर बिन्नीकडून प्रशिक्षण घेतले. 2001 च्या आशिया कपमध्ये 19 वर्षाखालील संघाकडून खेळताना त्याने केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला एडिलेड येथील जगप्रसिद्ध क्रिकेट अकादमीत 6 आठवड्यांसाठी प्रशिक्षण घेण्याची मोठी संधी मिळाली.

यानंतर त्याचा देदीप्यमान प्रवास सुरू झाला. 2002 साली न्यूझीलंड येथे झालेल्या 19 वर्षांखालील संघाच्या विश्वकप स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. याचेच बक्षीस म्हणून त्याची भारतीय अ संघात निवड झाली. इथेच त्याला भारतीय संघाचा माजी महान खेळाडू आणि त्या संघाचा प्रशिक्षक यशपाल शर्मा यांनी हेरले आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याला पारखून बीसीसीआयकडे त्याची शिफारस केली.

यानंतर सुरू झाला तो स्वप्नवत प्रवास. भारतीय संघाचा 2002 साली इंग्लंड दौरा होणार होता, ज्याचा कर्णधार होता सौरभ गांगुली. या संघात मुख्य यष्टीरक्षकासाठी अजय रात्रा सोबत पार्थिवचीही मुख्य संघात निवड झाली, तेव्हा तो 18 वर्षांचा सुद्धा झाला नव्हता. याच दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अजय रात्रा जखमी झाला अन् पार्थिवसाठी आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातल्या पदार्पणाची संधी साधून आली. पहिल्या डावात तो शून्यावरच बाद झाला, पण दुसऱ्या डावात भारतीय संघ पराभवाच्या खाईत असताना त्याने जबरदस्त संयम आणि टेम्परामेन्ट दाखवत एक छोटीच पण संघासाठी खूप मोठी खेळी करून पराभव टाळला.

तेव्हा सामना अनिर्णित होताच कर्णधार गांगुलीच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघून आणि पार्थिवने दाखवलेली प्रगल्भता बघून भारतीय संघाला एक नवा पण असली हिरा गवसलाय असेच साऱ्यांना वाटले होते. त्यानंतर 2003 साली झालेल्या एकदिवसीय विश्वकप स्पर्धेतही त्याची भारतीय संघात निवड झाली. दुर्दैवाने त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही, पण त्याच्यावर नशीब प्रसन्न झाले होते.

त्याचे कमी वय आणि त्याची प्रतिभा बघता तो खूप वर्षे भारतीय संघासाठी आपले योगदान देईल, असेच सर्वांना वाटत होते; पण त्याला तसे करण्यात अपयश आले. त्याची फलंदाजी चांगली होती, पण यष्टीरक्षण तितके मजबूत नव्हते. याच दरम्यान भारतीय संघात त्याला केवळ 20 कसोटी सामने खेळायला मिळाले, तर फक्त 14 च एकदिवसीय सामन्यात त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

कसोटीत त्याने 4 अर्धशतके केली, पण एकदिवसीय सामन्यात मात्र त्याला खास ठसा उमटवता आला नाही. त्याची 28 ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या होती, तर कसोटीत 69 धावांची सर्वोच्च खेळी होती. याच दरम्यान भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी या दोन नावांचे वलय प्रस्थापित व्हायला लागले होते. त्यातच पार्थिवची कामगिरी पाहता त्याला आणखी संधी मिळू शकणार नाही हेच सिद्ध होत होते.

2004 साली शेवटचा एकदिवसीय तर 2008 साली शेवटच्या कसोटीत खेळलेल्या पार्थिव पटेलला नंतर धोनीच्या जबरदस्त कारनाम्याने संघातून जवळपास बाहेरच केले. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून भाग घेतला खरा; पण त्याने त्याच्यासाठी पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय सामन्यातल्या पुनरागमनाचे दरवाजे उघडले नाहीत ते नाहीतच. 20 कसोटीत फक्त 693 धावा, तर 14 एकदिवसीय सामन्यात फक्त 132 धावा त्याच्या नावावर आहेत. कसोटीत यष्टीमागे 49 बळी अन् एकदिवसीय सामन्यात 15 बळी त्याच्या कामगिरीला न्याय देत नाहीत.

असे का झाले, हे खरेच अनाकलनीय आहे. तो यापेक्षा नक्कीच चांगली कामगिरी करू शकणारा खेळाडू होता; पण त्याला ते करून देता आले नाही. अन् अतिशय कमी वयात, कमी कालावधीतच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.
परमेश्वराने त्याला प्रचंड प्रतिभा दिली होती, त्याला योग्य वेळी संधीही मिळाली, पण त्या संधीचे सोने करण्यात तो यशस्वी ठरला नाही, हे नाईलाजाने का होईना मान्य करावेच लागेल. यामागे कसला शाप होता हे त्या परमेश्वरालाच माहिती. मी तर अतिशय सामान्य माणूस. मला त्याचे कसे आकलन व्हावे? पण एक नक्की. मला त्याची अशी अकाली संपलेली कारकीर्द पाहून त्याला शापित गंधर्व म्हणावेसे वाटते.

भारतीय संघासाठी एकदा प्रतिनिधित्व केले की आयुष्याचे सोने होतेच, त्याबरोबर आयपीएल मधूनही जबरदस्त कमाई. यामुळे पार्थिव पटेलच्या आयुष्याचे सोने झाले आहे, हे सत्य. त्याने आता समालोचनही करायला सुरुवात केली आहे. पण याच बरोबर त्याच्या हातून भारतीय क्रिकेटचे आणखीन भले होवो, इतकीच प्रार्थना परमेश्वराकडे या निमित्ताने करावी वाटते.
त्याच्या पुढील आयुष्यात सर्व काही उत्तम घडो हेच मागणे!

– विवेक दिगंबरराव कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.