Shapith Gandharva Part 7 : शापित गंधर्व – भाग सातवा – विठाबाई नारायणगावकर

एमपीसी न्यूज : त्या म्हणे स्टेजवर नृत्य करताना (Shapith Gandharva Part 7) रसिकांना जणू एखाद्या विजेसारख्या भासत. गोड गळा, सोबत परमेश्वराने दिलेले सौंदर्य, जबरदस्त नृत्यकौशल्य आणि उपजत असलेल्या अभिनय कौशल्याने त्यांनी एक काळ जबरदस्त गाजवला होता. त्यांना एकदा नाही, तर तब्बल दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने गौरवले गेले होते. उमेदीच्या काळात प्रचंड यश, पैसा, मान-मरातब सर्व काही उपभोगल्यानंतरही त्यांचे उर्वरित आयुष्य आणि खास करून वार्धक्य अतिशय हलाखीत गेले.
सिनेमा, राजकारण, क्रीडा, संगीत असे अनेक विषय आणि त्यातील शापित गंधर्व आपण पाहिल्यानंतर आज पहिल्यांदाच मी ‘तमाशा’ या लोकप्रिय लोककलेतील एकेकाळची सम्राज्ञी ते नंतर अन्नपाण्यासाठीही मोताद झालेली एक महान लोककलावंत म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ‘विठाबाई भाऊ नारायणगावकर’ यांच्याबद्दल बोलणार आहे.
या लेखमालेत आतापर्यंतचे प्रकाशित झालेले सर्व लेख पुरुषांवर होते, त्यामुळेही लेखमाला फक्त पुरुषांपुरतीच आहे का असा गैरसमज होण्याची शक्यता होती. मात्र, माझा प्रयास विविध क्षेत्रातले शापित पण अतिशय प्रतिभावंत गंधर्व आपल्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयास आहे. हे मी अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो.
मी मूळचा बीड जिल्ह्यातील पाडळी या गावचा. आमच्या मराठवाड्यात ‘श्री क्षेत्र नारायणगड’ हे संस्थान भाविकांसाठी अतिशय श्रद्धेचे ठिकाण आहे. मराठवाड्यातील महान संत स्व. भगवानबाबा यांनी सुरुवातीच्या काळात इथेच काही वर्षे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले होते आणि आपली सेवाही दिली होती. याच नारायणगडावर पूर्वी संतश्रेष्ठ महादेवबाबा  आणि नारायण महाराज (ज्यांच्या नावावरून या गडाचे नामकरण झाले) यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दिवाळीनंतरच्या येणाऱ्या एकादशीला एक मोठी यात्रा भरत असे. (आताही भरत असेल कदाचित, कारण मी गाव सोडून अनेक वर्षे लोटली आहेत) ज्यासाठी त्याकाळचे अनेक मोठमोठे तमाशाचे फड येत असत. आमच्या गावातूनही या यात्रेसाठी असंख्य श्रद्धाळू भाविक आणि हौसे-गवसेही जात असत.
तिथून गावी परतल्यानंतर ती मंडळी तिथल्या (Shapith Gandharva Part 7) तमाशापटाचे भरभरून वर्णन करत. (मला आठवते एकदा मी हट्ट करून मोठ्या भावासोबत त्या यात्रेला गेलो होतो. आम्ही तिथे केलेली धमाल आठवते. पूर्वी तमाशाचे फड भरले, तरी काहीच लोक तो कलाविष्कार बघायला जात असत. सरसकट कोणीही जात नसे. पण याबाबत मी आणि माझा ज्येष्ठ बंधू वडिलांना खूप मानतो; कारण त्यांनी आम्हाला असे बंधन कधीही घातले नव्हते.) ‘दत्तोबा महाडिक, काळू-बाळू, भाऊ-बापू’ यांची नावं त्यांच्या तोंडात असायची आणि त्याचसोबत एक नाव कॉमन असे, ते म्हणजे विठाबाई नारायणगावकर. ‘ती बिजली होती’, असे मी त्या वयात अनेकदा ऐकले. मला दुर्दैवाने कधीही त्यांना बघायला मिळाले नाही; पण मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार स्व.माधवराव गडकरी यांनी त्यांच्या उतारवयातल्या हलाखीच्या परिस्थितीवर लिहिलेला एक लेख वाचल्यावर मी जिज्ञासेपोटी त्यांची माहिती काढली होती. आज त्यावर लिहायचा योग येतोय.
त्यांच्या एकंदरीतच कारकिर्दीकडे एक नजर टाकता असे दिसते, की त्यांचे आयुष्य जणू एक ‘चित्तरकथा’ होती; एक चित्रपटच होता. उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठू माऊलीच्या ‘पंढरपूर’ या तीर्थक्षेत्री त्यांचा जन्म 1 जुलै 1935 साली झाला. त्यांचे वडील भाऊ हे विख्यात शाहीर पठ्ठे बापूराव यांचे शिष्य होते. त्यांचा भाऊ ‘बापू मांग नारायणगावकर’ यांचा तमाशा फड स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचंड लोकप्रिय होता. त्यांचे दोन्ही भाऊ बापू आणि सावळा, मुली मनोरमा, केशर, विठाबाई, मुले शंकर, पांडुरंग असे सर्वच कुटुंबीय त्यांच्या फडात सहभागी असत.
साहजिकच विठाबाईला तमाशाचे सर्व धडे आणि बाळकडू घरातच मिळाले. वयाच्या 8 व्या वर्षीच विठाबाई त्याकाळचे सुप्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांच्या फडात काका व भाऊ-बहिणी यांच्यासोबत काम करायला लागल्या. याच फडाच्या सुपारीच्या निमित्ताने विठाबाईंनी पुढील चार वर्षातच राज्यभर आणि देशाची राजधानी दिल्लीतही अनेक सांस्कृतिक आणि नृत्याचे कार्यक्रम करत आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्या पुन्हा वडिलांच्या फडात परत आल्या. त्यांच्या बहिणी रमाबाई, केशरबाई गायन करत असत.
विठाबाईंनी मात्र नृत्य करण्याचे ठरवले. त्यांच्या नृत्याची शैली अतिशय मोहक आणि दिलखेचक होती. लहान वयातच जगाचा कटू अनुभव घेतलेल्या विठाबाईंनी ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’ हे गाणे असंख्य वेळा साभिनय सादर करून अजरामर केले. यामुळेच त्यांच्या फडाचे नाव सर्वदूर पोहचले. सोबतच आर्थिक स्थैर्यही मिळायला लागले. 1961 साली त्यांचे काका ‘बापू’ यांना सर्वोच्च आणि अतिशय प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. यावेळी विठाबाईंनी राष्ट्रपती सदनात बहारदार लावणी सादर करून आपल्या अदाकारीचा सर्वोत्तम नमुना पेश केला.
पुढच्याच वर्षी भारत-चीन सीमेवर आपल्या (Shapith Gandharva Part 7) जवानांसाठी खास वगनाट्य सादर करून त्यांचे मनोरंजन केले. यामुळे त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. विठाबाईंची कारकीर्द भरात असताना हौसा-मंजुळा कोल्हापूरकर, काळू-बाळू कवलापूरकर, दादू इंदुरीकर, दत्तोबा तांबे-शिरोलीकर, दत्ता महाडिक-पुणेकर असे नावाजलेले फड होते. अंतर्गत मतभेदांमुळे ‘भाऊ-बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड सोडून विठाबाईंनी स्वत:चा ‘विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड 1970 मध्ये सुरू केला. विठाबाईंनी ‘आईचं काळीज’, ‘रायगडची राणी’, ‘रक्तात न्हाली कुर्‍हाड’ अशी अनेक नवी वगनाट्ये बसवली; मात्र ‘मुंबईची केळीवाली’ हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय वगनाट्य होते.

विठाबाईंचे रूप, अदा व नृत्य या सार्‍यांची प्रेक्षकांवर खूपच मोहिनी होती. विठाबाईंचे नाव ‘तमाशाची राणी’ म्हणून गाजू लागले.  विठाबाईंनी 1950 ते 1980 अशी तीन दशके तमाशाच्या क्षेत्रात एखाद्या सम्राज्ञीसारखी गाजवली. पुण्यात 1968 साली भरलेल्या ‘अखिल भारतीय तमाशा परिषदे’च्या त्या स्वागताध्यक्षा होत्या. विठाबाईंच्या नृत्यकौशल्याचा वापर तमाशाबरोबरच चित्रपटांतही केला गेला. ‘कलगी तुरा’ (1955), ‘उमज पडेल तर’ (1960), ‘छोटा जवान’ (1963), ‘सर्वसाक्षी’ (1978) या चित्रपटांत त्यांनी नृत्ये केली होती. त्यांच्या बाबत एक किस्सा असाही आहे, की शिखर शिंगणापूर येथे एका वगाची सुपारी घेतलेली असताना वगनाट्याच्या दरम्यान नऊ महिन्याच्या गर्भवती असलेल्या विठाबाईंना प्रसूतीवेदना सुरू झाल्याने त्या स्टेजच्या मागे गेल्या, बाळाला जन्म दिला आणि पुन्हा स्टेजवर आल्या. तेव्हा उपस्थित प्रेक्षकांना काय झाले याचा अंदाज आल्याने त्यांनी हात जोडून त्यांच्या या आपल्या व्यवसायाप्रति असलेल्या बांधिलकीला विनम्रपणे कुर्निसात करत त्यांना विश्रांती घेण्यासाठी भाग पाडून त्यांच्या बांधिलकीचा एक प्रकारे गौरवच केला.
असे ते रसिक आणि अशा त्या विठाबाई. खरे तर त्याकाळी मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणजे वगनाट्य. पण तरीही अस्सल रसिक निव्वळ दौलतजादा करणारे नव्हते, तर खऱ्या अर्थाने कलाकारांना यथायोग्य सन्मान देणारेही होते. ही दंतकथा नाही तर सत्यकथा आहे.
सर्व काही चांगले चालले होते. पण, कलावंत कितीही महान असला, तरी वैयक्तिक आयुष्यात व्यवहारात फारसा अचूक अन तरबेज नसतो हेच खरे. विठाबाईच्या बाबतीतही असेच झाले. विठाबाईंनी मारुती सावंत ऊर्फ अण्णा मर्चंट यांच्याशी विवाह केला. पण तो संसार फारसा यशस्वी ठरला नाही. अशिक्षित विठाबाईंच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन तिचा सारा पैसा सावंतांनी हडप केला. एकीकडे विठाबाईंचे वय वाढत होते, तर दुसरीकडे तमाशातील व्यावसायिक समीकरणे आणि अभिरुचीही बदलू लागली होती. फड चालवणे बिकट होऊ लागले. विठाबाईंनी मोठी मुलगी मंगला आणि पुढे संध्या आणि भारती, मालती या मुलींना उभे केले. त्यामुळे फडाला थोडा आधार मिळाला. मात्र, पुढे मुलींनी वेगळे फड काढल्याने हे सुख फार काळ टिकले नाही. फड कर्जबाजारी झाला. फड 1990 च्या सुमारास बंद करण्याचा निर्णय घेऊन विठाबाई निवृत्त झाल्या.
एके काळी तमाशातील अदाकारीने जो प्रचंड पैसा कमावला, त्या पैशांचा संचय मात्र विठाबाईंना करता आला नाही. परिणामी आयुष्याच्या संध्याकाळचे दिवस तिला अतिशय खडतरपणे काढावे लागले. आर्थिक चणचण तर होतीच; परंतु वार्धक्यात त्यांना अनेक व्याधींनी घेरले. पत्रकार माधव गडकरी यांच्यासारख्या काही कलाप्रेमींनी विठाबाईंना आर्थिक साहाय्य मिळवून दिले. ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत आणि तत्कालीन पंतप्रधान स्व. नरसिंहराव व अन्य राजकारणी लोकांनी विठाबाईंना देणगी पाठवली, यामुळे उपचार चालू राहिले. मात्र दौर्‍यांच्या धांदलीत गेलेले आयुष्य, दारूचे व्यसन, पतीची मारहाण, बेछूट स्वभाव आणि हृदयविकार या साऱ्यांचा परिपाक म्हणून विठाबाईंचे शरीर क्षीण झाले होते. अखेरीस अर्धांगवायू आणि मेंदूज्वराच्या आजारामुळे विठाबाईंचे पुण्यात निधन झाले.
कलाकार म्हणून त्यांनी अलौकिक यश मिळवले, यात काहीच शंका नाही; पण दैनंदिन आयुष्यात रसिकांच्या प्रेमाइतकेच किंबहुना त्याहूनही कितीतरी जास्त कामाला येतो तो पैसा. दुर्दैवाने विठाबाईंना प्रचंड प्रमाणात मिळालेल्या पैशाचा यथायोग्य विनियोग करता न आल्याने त्यांचे वार्धक्य अतिशय खडतर गेले. मृत्यू हे अटळ आणि शाश्वत सत्य आहे; मात्र किमान आपला मृत्यू तरी सुसह्य व्हावा, यासाठी माणसाने योग्य ती तजवीज करावी, इतकाच धडा या निमित्ताने प्रत्येकाने घ्यावा, असे सांगावे वाटते. या महान लोककलावंत आणि तमाशासम्राज्ञीला भावपूर्ण श्रद्धांजली!
– विवेक कुलकर्णी
सौजन्य गुगल विकीपिडिया

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.