Singer S.P. Balsubrahmanyam passes away : मधुर आवाजाचे पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

एमपीसी न्यूज – कोरोनाने आणखी एका कलाकाराचे निधन झाले असून सुप्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम(वय ७४) यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील 5 ऑगस्टपासून एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यावर चेन्नईतील एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु होते.

डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होती. मात्र, गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली होती. आज मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

बॉलिवूडमध्ये सलमान खानचा आवाज म्हणून विशेष करुन ओळखल्या जाणा-या एस. पी. यांना प्रेमाने ‘बालू’ म्हटले जाते. सुमारे दशकभर त्यांनी सलमानसाठी एकाहून एक गाणी गायली. ‘मैनें प्यार किया’ या चित्रपटातील ‘दिल दिवाना’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी आंध्र प्रदेश येथील नल्लोर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील रंगमंचाशी जोडलेले होते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाही ते संगीत शिकत होते. त्यांनी पहिल्यांदा तेलुगू कल्चर संस्थेतील संगीत स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. 1966 मध्ये त्यांना ‘श्री श्री श्री मर्यादा रमन्ना’ या चित्रपटात गाण्यासाठी पहिली संधी मिळाली. यानंतर ते तामिळ आणि तेलगू चित्रपटासाठीच गात राहिले.

त्यांनी पहिल्यांदा ‘एक दूजे के लिए’ या हिंदी चित्रपटात कमल हसनसाठी गाणी गायली. या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट झाली आणि बॉलिवूडला एकदम युनिक आवाजाचा गायक मिळाला. ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला. मात्र फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळून देखील पुरस्कार मिळाला नाही.

सलमान खानच्या करिअरच्या सुरुवातीला बालसुब्रमण्यम यांनी त्याला आवाज दिला होता. ‘मैंने प्यार किया’ सारखे चित्रपटातील ‘आते जाते’, ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’, ‘मेरे रंग में रंगने वाली’ आणि टायटल साँग (मैंने प्यार किया) बालसुब्रमण्यम यांनी गायली होती. ‘दिल दीवाना बिन सजना के माने ना’या गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक गायकाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले गाणे ‘दीदी तेरा देवर दीवाना’साठी फिल्मफेअरचा विशेष पुरस्कारदेखील मिळाला.

जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ज्यावेळी सर्वत्र किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचाच बोलबाला होता, त्यावेळी त्यांच्यासमोर एस. पी. बालसुब्रमण्यम हा एकच गायक मजबुतीने उभा राहू शकत होता. ‘सागर’या चित्रपटातील गाणी जावेद साहेबांनी लिहिली होती. यात एक ‘यूं ही गाते रहो, यूं ही मुस्कुराते रहो’ हे मस्तीखोर गाणे रेकॉर्ड होणार होते. हे गाणे ऋषी कपूर आणि कमल हसनवर चित्रीत केले जाणार होते. हे गाणे मस्तीचे असल्यामुळे दुसरा गायकही किशोर कुमार यांच्या स्टाइलने गाणारा पाहिजे होता. आर. डी. बर्मन आणि जावेद यांनी हे गाणे बालसुब्रमण्यम यांच्याकडून गाऊन घेण्याचा विचार केला. या गाण्यामध्ये बालसुब्रमण्यम किशोरकुमार यांच्या तोडीस तोड गाऊ शकतील नाही याचा दोघांनाही संशय होता. मात्र, ज्यावेळी गाणे रेकॉर्ड झाले तेव्हा बालसुब्रमण्यम यांनी सिद्ध केले की, ते तामिळ आणि तेलुगूमध्येच नव्हे तर हिंदीतदेखील खूप उत्कृष्ट गाणी गाऊ शकतात.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कन्नडमध्ये 21 गाणी रेकॉर्ड केली. हा एक अनोखा असा रेकॉर्ड आहे. नंतर त्यांनी एका दिवसात तामिळमध्ये 19 आणि हिंदीमध्ये 16 गाणी रेकॉर्ड केली आहेत.

एक काळ असा होता की, एका दिवशी ते 15-16 गाणी रेकॉर्ड करणे ही त्यांची दिनचर्या झाली होती. स्वत: बालसुब्रमण्यम नेहमी मोहम्मद रफी यांच्या गाण्याचे चाहते होते. त्यांना त्यांच्यासोबत एखाद्या चित्रपटात गाणेही गायचे होते, परंतु त्यांना संधीच मिळाली नाही. त्यांना रफी साहेबांची सर्वच गाणी खूप आवडतात, परंतु ‘तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है…’ हे गाणे खूप आवडते होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.