Pimpri : बकरी ईदसाठी तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथे कत्तलखाना

एमपीसी न्यूज – बकरी ईदसाठी दरवर्षीप्रमाणे नेहरूनगर येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना उभारून त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

Pimpri : नदीत प्लास्टिक, दूषित कचरा जाऊ नये यासाठी उपाययोजना

महापालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी (Pimpri ) येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त संदिप खोत, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे, रामनाथ टकले, देवण्णा गट्टूवार, अनिल राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक के. एस. पठारे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, उपअभियंता वाडकर एस. व्ही, संजय माने, माहिती जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यामध्ये सादिक कुरेशी, हसन कुरेशी, आरिफ कुरेशी, धम्मराज साळवे, जमील कुरेशी, फय्याज शेख, अस्लम पठाण, फारूख इनामदार, खालिद मुजावर, शफीकउल्ला काजी, अब्दुल कुरेशी आदींचा सहभाग होता.

महापालिकेच्या वतीने बकरी ईदसाठी नेहरूनगर येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपातील कत्तलखाना स्थापित करण्यात येणार आहे. त्याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच पुरेशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी आणण्यात आलेल्या गुरांना ठेवण्यासाठी पुरेशा जागेची व्यवस्था करणे, आवश्यक पाण्याचा पुरवठा करणे, तसेच कुर्बानीनंतर निर्माण होणारे वेस्ट तात्काळ उचलण्याबाबत पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणांची व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन, सर्व संबधित विभागातील कर्मचा-यांनी समन्वय साधून सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

पाण्याचा पुरवठा अधिक प्रमाणात करण्यात यावा, गुरे बांधण्यासाठी काही दिवस आधी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, कत्तलखान्याच्या परिसरातील स्वच्छता करण्यात यावी, कायमस्वरूपी कत्तलखाना उभारण्यात यावा आदी मागण्या यावेळी बैठकीत उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.