Pimpri : नदीत प्लास्टिक, दूषित कचरा जाऊ नये यासाठी उपाययोजना

एमपीसी न्यूज – जैवविविधता पार्क, वेस्ट टू वंडर गार्डन, सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुनर्वापर, सायकलस्वारांसाठी हरितसेतू अशा विविध उपक्रमांवर महापालिका काम करीत आहे. नदी सुधार प्रकल्प राबविताना नदी स्वच्छ राहावी याकरिता नदीमध्ये दूषित पाणी जाऊ नये याची खबरदारी घेतली जाणार असून नाल्याचे पाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडले जावे यासाठी महापालिकेने प्रकल्प निर्मिती आणि उपाययोजना केल्या आहेत. नदीत प्लास्टिक किंवा इतर दूषित कचरा जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Chikhli : आठ महिन्याच्या बाळाचा खून करत आईचा आत्महत्येचा प्रयत्न

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहराला राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. या यशामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा मोठा वाटा आहे. पर्यावरणाची लोकचळवळ व्यापक करण्यासाठी असेच सहकार्य आणि योगदान प्रत्येकाने द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शहरात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी तसेच महापालिकेला मिळालेल्या पुरस्कारानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, रविकिरण घोडके, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक उद्यान अधिक्षक मंजुषा हिंगे तसेच पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

यामध्ये मुक्ती पानसे, सोनाली जयंत, तन्मय डुंबरे, सुदीप मरूळकर, एस. एस. हसबनीस, विनीता दाते तसेच चंद्रकांत कुलकर्णी, संजिवनी मुळे, अशोक सोनवणे, अनिता काने, धनंजय शेडवाळे, ओंकार नाझरकर, माधव पाटील, राजीव भावसार, तुषार शिंदे, अविनाश चिलेकर, शिवानंद चौगुले, निशीगंधा मेहता, प्रमोद पवार आदी उपस्थित होते.

पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहराला पर्यावरणपुरक शहर बनवण्यासाठी ९ कलमी उपक्रम महापालिका राबवित आहे. या उपक्रमाची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दिली. पर्यावरणविषयक विविध बाबींसाठी नियोजन, उपाययोजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थासोबत वेळोवेळी संवाद साधण्यात येईल.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, हरितक्षेत्र वाढविणे, कचऱ्यापासून वीजनिर्मिती व खतनिर्मिती करणे, जैवविविधता जपण्यासाठी मोहीम राबविणे, वेस्ट टू वंडर गार्डनसारखे उपक्रम राबविणे, एसटीपी प्रकल्पांची उभारणी करणे, इलेक्ट्रिक वाहने वापरासाठी प्रोत्साहन पर योजना राबविणे, नदीसुधार प्रकल्प राबविणे, हरितसेतू तयार करणे, सस्टेनेबिलीटी सेलची स्थापना करणे अशा विविध उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिली. पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विविध सामाजिक संस्था कार्यरत असतात, त्यांच्यासोबत या बैठकीत संवाद साधण्यात आला.

महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना सिंह म्हणाले, पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्यापक करून त्याचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे यासाठी पर्यावरण प्रेमी आणि संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधून पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम आणि योजनांची अंमलबजावणी केली जाईल. जैवविविधता पार्क, वेस्ट टू वंडर गार्डन, सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुनर्वापर, सायकलस्वारांसाठी हरितसेतू अशा विविध उपक्रमांवर महापालिका काम करीत आहे.

नदी सुधार प्रकल्प राबविताना नदी स्वच्छ राहावी याकरिता नदीमध्ये दूषित पाणी जाऊ नये याची खबरदारी घेतली जाणार असून नाल्याचे पाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडले जावे यासाठी महापालिकेने प्रकल्प निर्मिती आणि उपाययोजना केल्या आहेत. नदीत प्लास्टिक किंवा इतर दूषित कचरा जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मोशीमधील कचऱ्याचा ढीग कमी करण्यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती, बायोगॅस आणि खतनिर्मिती असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. प्लस्टिकचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी जनजागृती केली जात आहे. आरआरआर उपक्रमाबाबत बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत निरूपयोगी वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून महापालिका शहरात कायमस्वरूपी आरआरआर झोन उभारण्याचा विचार करत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देऊन लोकसहभाग वाढविण्याकडे महापालिका लक्ष देत आहे. या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सिंह यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पर्यावरणविषयक विविध सुचना यावेळी मांडल्या. योग्य त्या सुचनांचा अंतर्भाव महापालिकेच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये करण्यात येईल असे आयुक्त सिंह यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.