SSC HSC EXAM : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार अधिकची दहा मिनिटे

एमपीसी न्यूज – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिकची ( SSC HSC EXAM ) दहा मिनिटे देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली.
दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तसेच प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी परीक्षा दलनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे करण्यात येत होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पालक व समाजातील विविध घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च 2023 च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती.
विद्यार्थी हित लक्षात घेत व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून ही दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परीक्षांसाठी वाढवून दिली जाणार आहेत. दहावी बारावीच्या या वर्षीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात होणार आहेत. सकाळच्या सत्रात अकरा वाजता तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा त्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक ( SSC HSC EXAM ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.