Pune News : न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ सुरु करा; भाजप वकील आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज अर्धवेळ सुरु आहे. बरेच दावे, खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ सुरु करावे, अशी मागणी पुणे शहर भाजप वकील आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

वकील आघाडी तर्फे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री गोसावी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वकिल आघाडीचे पदाधिकारी उपाध्यक्ष अॅड. श्रीराम कांबळे, सरचिटणीस  अॅड. मोहना गद्रे, चिटणीस अॅड राजन देशपांडे,  अॅड. निलीमा शिंदे – वरपे,  अॅड. गीता पानसे, कॅटोंन्मेंट मतदार संघ अध्यक्ष अॅड. सचिन राणे, खडकवासला मतदारसंघ सरचिटणीस अॅड. अक्षय क्षिरसागर, अॅड. विजय राठोड,  अॅड. शेठ आदी उपस्थित होते.

पुणे शहर भाजप वकील आघाडीच्या अध्यक्षा अॅड. ईशानी जोशी यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना महामारीच्या संकटामुळे न्यायालयाचे कामकाज मागील दीड वर्षांपासून अकरा ते दोन या वेळेतच सुरु आहे. त्यामुळे बरेच दावे व खटले मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिले आहेत.

मागील आठवडाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाची वेळ देखील वाढवून न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने व पूर्ण दिवस पूर्ववत सुरु करावे.

न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ सुरु केल्याने प्रलंबित खटले मार्गी लावण्यास सुरुवात होईल. पक्षकार आणि वकील दोघांच्या दृष्टीने हे न्यायाचे होईल, असेही अॅड. जोशी  म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.