Nigdi : बहारदार गायन व नृत्याने स्वरसागर महोत्सवाची दिमाखदार सांगता

एमपीसी न्यूज  – पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवात मंगळवारी (१५ ऑगस्ट) कार्यक्रमाची सुरुवात ‘आकार’ प्रस्तुत ‘अभिवादन भारतीय स्वातंत्र्याला’ या समूह गायनाच्या कार्यक्रमाने झाली.  प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर (Nigdi) नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या वेळच्या स्वरसागर महोत्सवात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समूह गायनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटातील सुमारे सोळा शालेय विद्यार्थ्यांनी ही देशभक्तीपर गीते अत्यंत तयारीने सादर केली.

Pcmc : मास्टर माईंड इंग्लिश मीडियम ग्लोबल स्कूल मध्ये 76 वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

त्याचे ओघवते व समर्पक निवेदन देखील या मुलांनीच केले. तसेच या गीतांना वाद्याची साथ देखील इतर पाच मुलांनीच केली. ‘हम करे राष्ट्र आराधन’, ‘तुम समय की रेत पर चलो निशान’, ‘भारत हमको जान से प्यारा हैं’, ‘कंधो से मिलते हैं कंधे, कदमोंसे कदम मिलते है’, ‘सुनो गौरसे दुनिया वालो’, ‘मां तुझे सलाम’ या सारखी देशप्रेम जागवणारी गीते त्याच्या समर्पक निवेदनासह अत्यंत ओजस्वीपणे या सर्व बालगायकांनी अत्यंत तयारीने सादर केली.

करोनाच्या साथीमध्ये ऑनलाईन पद्धतीने देखील या सर्वांचा सराव अखंड चालू होता. संस्थापिका चित्रा देशपांडे यांनी  त्यांच्या सहकारी प्राची पंडित आणि मु्ग्धा बारहाते यांच्यासह सुरु केलेल्या आकार संस्थेमार्फत लहान मुलांमध्ये दडलेल्या कलाकाराला आकार देण्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले जातात. या कार्यक्रमांमध्ये गायन, वादन, निवेदन सारे मुलांचेच असते.

पुढील सत्रात ‘शब्दरंग ज्येष्ठ नागरिक कला साहित्य कट्टा’ संस्थेच्या ज्येष्ठ कलाकारांनी स्वच्छता अभियान व प्लॅस्टिकमुक्त भारत या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. ज्योती कानेटकर व चंद्रशेखर जोशी यांनी त्यांच्या सहकारी कलाकारांसह देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा कसा उचलू शकतो याचे सुंदर दर्शन या पथनाट्यातून दिले. या पथनाट्याची संहिता ज्योती कानेटकर यांचीच होती.

त्यानंतर नृत्यशारदा कथक मंदिराच्या स्नेहल सोमण यांच्या विद्यार्थिनींनी ‘नृत्यांजली’ हे कथक नृत्य सादर केले. ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीने त्यांनी नृत्याला सुरुवात केली. त्यानंतर ‘रास’ या अनवट तालावर थाट, आमद, तोडे, तुकडे यासह नृत्य सादर केले. बेटी बचाव मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ‘ओ री चिरैया’ हे सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर ‘श्रीरामचंद्र कृपालू भज मन’ हे भजन सादर केले.

पं. बिंदादीन महाराजांची अष्टपदी सादर केली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘जयोस्तुते’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीपर गीतावर अत्यंत समर्पक नृत्य सादर केले. हवेली संगीतावर आधारित ‘मृगनयनी’ या ब्रज भाषेतील गीतावर  सुंदर नृत्य सादर केले. कृष्णलीला सांगणारे ‘जमुना के तट पर कृष्ण कन्हैया’ हे गीत सादर केले. पं. बिंदादीन महाराजांच्या ‘कलावती’ रागातील तराण्याने या कलाकारांनी त्यांच्या नृत्याची सांगता केली.

स्वरसागर महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका विदुषी मंजुषा कुलकर्णी यांच्या बहारदार आणि दमदार गायनाने झाली. त्यांनी यावेळी राग ‘बिहाग’ सादर केला. ‘कैसे सुख सोहे’ ही विलंबित लयीतील शब्दरचना असलेल्या राग प्रस्तुतीनंतर ‘बालम हे मोरे मनके’ ही द्रुत लयीतील रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर खास श्रावण महिन्याची नजाकत दर्शवणारा झूला सादर केला. ‘झूला धीरे से झुलावो बनवारी रे सावरिया’ हे शब्द असलेल्या या झूल्यातील विविध हरकतींवर रसिक मनसोक्त रंगून गेले. त्यानंतर रसिकांच्या आग्रहास्तव ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया, मोहे आवे नजरिया सावरिया’ ही होरी सादर केली. तसेच ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे नाट्यगीत सादर केले. मंजुषाताईंनी आपल्या गायनाची सांगता ‘का करु सजनी आये ना बालम’ या ढंगदार भैरवीने केली. दमदार ताना, दमसासावरील प्रभुत्व, अभ्यासपूर्ण सादरीकरण दर्शवणारे त्यांचे नेटके गायन रसिकांना मंत्रमु्ग्ध करुन गेले. त्यांना संवादिनीची अत्यंत उत्तम साथ अभिनय रवांदे यांनी तसेच दमदार तबला साथ रोहित मुजुमदार यांनी केली. या दोन युवा कलाकारांची साथ गायनाची रंगत आणखी खुलवून गेली. तसेच तानपुरा व गायन साथ रसिका वैशंपायन, अनुष्का साने आणि तनिष्क अरोरा यांनी केली.

स्वरसागर महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. समाधान गुडदे, नवीन अक्कीवेल्ली, डॉ. सुमेधा गाडेकर, साक्षी मुजुमदार व संजीव तांबे यांनी या स्पर्धांचे परीक्षण केले. शास्त्रीय गायनाच्या १५ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक स्वरा किंबहुने हिला व दुसरा क्रमांक युक्ता बामणे हिला मिळाला. तसेच १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक हिमांशु तांबे याला व द्वितीय क्रमांक संजना साळुंके हिला मिळाला.

तालवाद्य वादनात १५ वर्षांखाली गटात प्रथम क्रमांक निधीश गवस व दुसरा क्रमांक सोहम दीक्षित याला मिळाला. १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक वेद चिंचणकर व दुसरा क्रमांक ओंकार कुलकर्णी याला मिळाला. शास्त्रीय वादनात १५ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक स्वरुप कुलकर्णी याला व दुसरा क्रमांक हरी वाघमोडे याला मिळाला. १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक निमिषा हळबे हिला व दुसरा क्रमांक सानिका काटे हिला मिळाला.

शास्त्रीय नृत्य स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक रिया गोखले, दुसरा क्रमांक शाल्मली येळकर हिला मिळाला. तसेच १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक स्नेहल भालेराव हिला व दुसरा क्रमांक दर्शनी ठाकूर हिला मिळाला. या स्पर्धांच्या संयोजनासाठी स्मिता देशमुख यांनी महत्वाचे सहाय्य केले.

या सर्व पारितोषिक विजेत्यांना मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांच्या सह पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनच्या पदाधिका-यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी यांनी केले. आभार मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.