Talawade : वाहतूक कोंडीचे केंद्र बनतोय तळवडे परिसर

तळवडे परिसरात अपघातात चार दिवसात दोन मृत्यू, दोन गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – तळवडे परिसर अपघातग्रस्त बनला ( Talawade)  आहे. सततची वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे सतत होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मागील चार दिवसात झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे इथल्या वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मंगळवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजता त्रिवेणीनगर चौकाजवळ एका हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणारे दोघेजण रस्त्यावर पडले. त्यात एकजण गंभीर जखमी होऊन मृत पावला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत घडला.

Pune : पुस्तक खरेदीसाठी प्रत्येक व्यक्तीला मिळणार 100 रुपयाचे एक कुपन; वाचन संस्कृती संवर्धनासाठी चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

दरम्यान, शनिवारी (दि. 9) तळवडे येथून निगडीच्या दिशेने दुचाकीवरून दोन महिला जात होत्या. त्यांच्या दुचाकीला सिलेंडरने भरलेल्या ट्रकने धडक दिली. त्यात दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी गंभीर जखमी झाली.

वाहतूक विभागात असलेले अपुरे मनुष्यबळ, वाहनांची भली मोठी वर्दळ,अरुंद रस्ते आणि बेशिस्त वाहन चालक यामुळे तळवडे परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी तसेच अपघात होत आहेत.

त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण, देहूगाव-आळंदी हा मार्ग तळवडे मधून जातो. या मार्गावर चाकण चौकातून चिखली आणि त्यापुढे कायम वाहतूक कोंडी असते. कुदळवाडी मधील भंगारची गोदामे, चिखली एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसी यांना जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून देहूगाव – आळंदी या रस्त्याचा उपयोग होतो. आळंदी आणि देहूगाव या दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग असल्याने या मार्गावरून वारकऱ्यांची देखील गर्दी असते.

वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार

26 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. त्यात तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक इतरत्र बदलून गेले. त्यानंतर तळवडे वाहतूक विभागाचा अतिरिक्त कार्यभार वाहतूक शाखेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे देण्यात आला. त्यास भरीस भर म्हणजे तळवडे वाहतूक विभागात अवघे 22 अंमलदार नेमणुकीस आहेत. वाहतूक कोंडीत हिंजवडीनंतर तळवडेचा क्रमांक लागत आहे. त्यामुळे इथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक ( Talawade)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.