Pimpri : सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

एमपीसी न्यूज – मैला शुद्धीकरण केंद्र बंद असलेल्‍या 41 सोसायटीधारकांचे नळ कनेक्‍शन तोडण्याची (Pimpri) चुकीची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. ही कारवाई थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने महापालिकेला दिला आहे. तसेच चुकीचा अहवाल देणाऱ्या महापालिकेचे संबंधीत अधिकारी आणि विकसकावर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सांगळे यांनी दिलेल्‍या निवेदनात नमूद केले आहे की, महापालिकेकडून पिंपरी चिंचवड शहरातील 41 सहकारी गृह रचना संस्थांना त्यांच्या एसटीपी म्‍हणजेच मैला शुद्धीकरण केंद्र बंद असल्याने नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिस पूर्वी दिलेल्या होत्या. त्‍याला फेडरेशनने विरोध केला आहे. आयुक्‍त शेखर सिंह यांच्‍याबरोबर पत्रव्यवहार करून या गोष्टीला तीव्र स्वरूपाचा विरोध दर्शवला होता. सदर सहकारी गृह रचना संस्थांच्या मैला शुद्धीकरण केंद्र बसवताना संबंधित सर्व 41 सोसायट्यांच्या विकसकांनी या यंत्रणा अतिशय निकृष्ट दर्जाच्या बसवलेल्या आहेत.

तसेच सोसायटी हस्तांतरण करत असताना कोणत्याही प्रकारची सोसायटी धारकांची संमती घेतली नाही. एसटीपी बंद अवस्थेत असताना देखील त्या सोसायटीधारकांच्‍या माथी मारलेल्या आहेत. महानगरपालिकेने हे मैला शुद्धीकरण प्रकल्प पाहणी करण्यासाठी नेमलेल्या खाजगी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी याचे सर्वेक्षण व्यवस्थित केलेले नाही. यातील काही एसटीपी प्रकल्प हे चालू असल्‍याचे पत्र आयुक्तांना दिले होते. संबंधित सर्व गोष्टीची चौकशी करून यावर निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. तरी देखील सोसायटीचे नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम चालू केलेली आहे. ही मोहीम त्‍वरीत स्थगित करून या सर्व गोष्टींची चौकशी करावी, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

Talawade : वाहतूक कोंडीचे केंद्र बनतोय तळवडे परिसर

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

संबंधित विकसक आणि या गृह प्रकल्पांना चुकीच्या पद्धतीने बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी फेडरेशनने केली आहे. विकसक आणि बांधकाम (Pimpri) विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. याबाबत चर्चा करण्यासाठी फेडरेशनला वेळ देण्याची मागणी केली आहे. फेडरेशनच्‍या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तक्रारीची चौकशी करावी. मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत ही मोहीम स्थगित करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा चुकीच्या निर्णयविरुद्ध आणि चुकीच्या मोहिमे विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फेडरेशनच्‍या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून पिंपरी चिंचवड शहरातील 41 सहकारी गृहरचना संस्थांना एसटीपी (मैला शुद्धीकरण केंद्र) बंद असल्याने नळ कनेक्शन कट करण्याबाबत नोटीस दिल्या होत्या. त्याला आमच्या फेडरेशन कडून तीव्र विरोध आणि आक्षेप घेतला होता. परंतु आज पर्यावरण विभागाच्या मार्फत या 41 सोसायट्यांचे नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम चालू केलेली आहे.

त्याला आमचा तीव्र स्वरूपाचा आक्षेप आणि विरोध आहे. आमच्या तक्रारीवर निर्णय करावा अशी आमची मागणी आहे. तसेच संबंधित विकसक आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. तोपर्यंत आम्ही एकाही सोसायटीचे नळ कनेक्शन कट करू देणार नाही. महापालिकेने मनमानी करून ही मोहीम स्थगित केली नाही, तर फेडरेशन मार्फत मोठे आंदोलन उभारले जाईल, चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.