Talegaon : लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नववधूची आत्महत्या, न्यायासाठी आईचे पोलीस आयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज – लग्नानंतर अवघ्या आठवड्यात पत्नीला (Talegaon) कामाला पाठवले. वेगवेगळ्या कारणांसाठी तिचा छळ केला. सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेल्या नववधूने अवघ्या दीड महिन्यात सासरच्या छळाला कंटाळून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी नवविवाहितेच्या दिव्यांग असलेल्या आईने केली आहे. पोलिसांनी आपल्या मृत मुलीला न्याय दिला नाही तर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा नववधूच्या आईने दिला आहे.

प्रज्ञा कौशल भोसले असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी प्रज्ञा यांच्या आई प्रतिभा अनिल चव्हाण यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्ञा यांचा पती कौशल पिराजी भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रज्ञा आणि कौशल यांचा विवाह 11 मे 2023 रोजी झाला. तुमच्याच मुलीसोबत विवाह करायचा आहे, अशी जबरदस्ती करून हा विवाह करवून घेतला. लग्नाला अवघे पाच ते सहा दिवस होताच कौशल याने तिला कामावर जाण्यास सांगितले.

प्रज्ञा तळेगाव एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करीत होती. पतीच्या सांगण्यानुसार तिने कामावर जाण्यास सुरुवात केली. पण कौशल याची हाव वाढत गेली.

India News : चंद्रयान 3; भारताची सर्वात महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिम!

कौशल याने प्रज्ञाकडे तिचा वर्षभराचा पगार मागितला. दुचाकी घेण्यासाठी (Talegaon) आईकडून पैसे घेऊन येण्याची मागणी केली. आईने जागा विकून पैसे प्रज्ञाच्या हिच्या खात्यावर जमा केल्याचे कौशल याला समजताच त्याने त्या पैशांसाठी तगादा लावला. प्रज्ञा हिने हा प्रकार तिच्या बहिणीला आणि आईला फोनवरून सांगितला.

कौशल याचे मेडिकल दुकान आहे. प्रज्ञा रात्री कामावरून आल्यानंतर तो प्रज्ञाला मेडिकल दुकानातील काम सांगत असे. तसेच तिला उपाशीपोटी, गार फरशीवर झोपवत असे.

प्रज्ञाच्या आईने कौशल याच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यावरून कौशल याने प्रज्ञा सोबत भांडण केले. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेल्या प्रज्ञाच्या नशिबी हा छळ आल्याने तिने कंटाळून 3 जुलै रोजी इंदोरी येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरून उडी मारून आपले जीवन संपवले.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कौशल याचे आई, वडील, भाऊ आणि त्याची पत्नी यांना देखील आरोपी करून त्यांना अटक करावी. अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा फिर्यादी प्रतिभा चव्हाण आणि त्याच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.