Talegaon Dabhade : मॅक्डोनल्ड व्यवस्थापनाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा

एमपीसी न्यूज – मॅक्डोनल्ड कंपनीच्या व्यवस्थापनाच्या त्रासाला कंटाळून एका कर्मचाऱ्याने पुणे कामगार उप आयुक्तांकडे तक्रार केली आहे. योग्य न्याय न मिळाल्यास व्यवस्थापनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचा इशारा तक्रार अर्जात दिला आहे.

चंद्रकांत राजू गायकवाड (रा. उर्से, ता. मावळ) यांनी याप्रकरणी पुणे कामगार उप आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये मनोहर जाधव हा अधिकारी त्रास देत असल्याचे म्हटले आहे. तक्रार अर्जात पुढे म्हटले आहे की, गायकवाड हे उर्से टोल नाक्याजवळ असलेल्या मॅक्डोनल्ड फॅमिली रेस्टोरंटमध्ये 15 फेब्रुवारी 2012 पासून काम करत आहेत. या शाखेत कामगारांवर कामाचा ताण दिला जातो. या तणावामुळे यापूर्वी दोन व्यवस्थापकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. असाच दबाव आणून माझी बदली खालापूर येथे केली आहे.

कुटुंबासह खालापूर येथे जाणे शक्य नसल्याचे रेस्टोरंटचे व्यवस्थापक मनोहर जाधव यांना वारंवार सांगून देखील व्यवस्थापनाने काही ऐकले नाही. मनोहर जाधव यांच्यामुळे मी कामाचा राजीनामा दिला आहे. रेस्टोरंटमध्ये काम करत असताना माझ्यावर एक गुन्हा दाखल असून त्यासाठी देखील मॅक्डोनल्ड रेस्टोरंट जबाबदार आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मॅक्डोनल्डकडून मला मदत मिळावी, अशी विनंती केली असता मनोहर जाधव यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. मला न्याय मिळावा अन्यथा मी आत्महत्या करीन यासाठी मॅक्डोनल्ड रेस्टोरंट जबाबदार असेल, असेही तक्रार अर्जात म्हटले आहे.

याबाबत मनोहर जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.