Talegaon Dabhade : स्टेशन भागात पोस्ट ऑफिस सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेने केलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये तळेगाव स्टेशन परिसरात असलेले पोस्ट ऑफिस पाडण्यात आले. सध्या तात्पुरत्या स्वरूपात या कार्यालयाचे कामकाज गाव भागातील पोस्ट ऑफिसमधून चालत आहे. मात्र त्यामुळे खातेदार, पिग्मी कलेक्शन प्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असून त्वरित स्टेशन भागात पोस्ट ऑफिस सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सुमारे पन्नास वर्षापासून तळेगाव जनरल रुग्णालयाच्या आवारात तळेगाव स्टेशन पोस्ट कार्यालय कार्यरत होते. मात्र तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये ते अनधिकृत म्हणून पाडून टाकण्यात आले. त्यामुळे या पोस्ट ऑफिसवर अवलंबून असलेला संपूर्ण स्टेशन परिसर, वराळे, माळवाडी, इंदोरी, आंबी, नवलाख उंबरे, तळेगाव दाभाडे एमआयडीसी आदि परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. या टपाल कार्यालयाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. वास्तविक नगर परिषदेच्या कारवाई अगोदर या पोस्ट ऑफिससाठी स्टेशन परिसरात जागा उपलब्ध व्हावी म्हणून पोस्ट ऑफिस प्रशासनाने खूप प्रयत्न केले. मात्र त्याला दाद मिळाली नाही.

सध्या तात्पुरत्या स्वरूपात या कार्यालयाचे कामकाज गाव भागातील पोस्ट ऑफिसमधून चालत आहे. मात्र त्यामुळे खातेदार, पिग्मी कलेक्शन प्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. पोस्टाची दैनंदिन कामे करण्यासाठी नागरिकांना सुमारे तीन किलोमीटर अंतरावर यावे लागते, यासाठी रिक्षा, पीएमपीएल बस मधून किंवा पायपीट करून यावे लागते. यामध्ये खातेदाराचा वेळ, पैसा खर्च होतो. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित स्टेशन भागात पोस्ट ऑफिस सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.