Talegaon Dabhade : शिक्षणाची प्रेरणा गुलामगिरीची नसावी – कवी नारायण सुमंत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात (Talegaon Dabhade) मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करत कुसुमाग्रजांच्या साहित्यिक कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. भाषासौंदर्य जपणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जमेल तिथे मातृभाषेचा आग्रह धरून भाषेच्या वैभवात भर कशी घालता येईल याचा प्रत्येकाने विचार करायला हवा असे मत या कार्यक्रमात मांडण्यात आले. विद्यार्थी हा शक्यतांचा समुद्र असतो त्यामुळे शिक्षणाची प्रेरणा गुलामगिरीची न राहता ती आत्मनिर्भरतेची असायला हवी असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. त्यांनी त्यांच्या विडंबनपर काव्यातून मराठी भाषेच्या सौंदर्याने उपस्थितांना मोहून टाकले.

मातृभाषेचा आदर का करायचा  तर जिने जन्म दिला,तीच प्रेम देऊ शकते, लळा लावू शकते तीला आई म्हणतात.आई आणि मातृभाषा या सारख्याच असतात.आपला श्वास आकाराला आला की पहिलं सानिध्य या दोन गोष्टींचे लाभते या अर्थाने आपण खूप भाग्यवान आहोत. ज्ञानेश्वरी,गाथा,भागवत ही आपली खरी श्रीमंती आहे. नोट खर्च होते पण पुस्तके शिल्लकीतली संपत्ती आहे.

Pune News : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मविआचे रवींद्र धंगेकर आणि रुपाली ठोंबरेंविरुद्ध गुन्हा दाखल

मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे,विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना सुमंत यांनी भाषेच्या श्रीमंतीचा आढावा घेत अलंकार,वृत्त, छंद, मात्रा यांच्यात रसात्मकता असते. स्वरांमुळे कविता लक्षात राहत नाही पण ती म्हणजे गेय स्वरूपाची असेल तर ती मनाचा ठाव घेते असे सांगत त्यांनी आपल्या काही स्वरचित विडंबनात्मक कविता सादर करून हास्याचे कारंजे फुलवले.

आम्ही आडनावाचे शेतकरी,पतंग,बारबाला, धरण,हरितक्रांती अशा आपल्या प्रसिद्ध (Talegaon Dabhade) विडंबनात्मक कविता सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषा दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या साहित्यिक कारकिर्दीला उजाळा दिला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मलघे म्हणाले की,भाषासौंदर्य जपणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जमेल तिथे मातृभाषेचा आग्रह धरून भाषेच्या वैभवात भर कशी घालता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. आजच्या अस्वस्थ भवतालात संवादाचे माध्यम म्हणून भाषेइतके समाधान अन्य कोणतीही बाब देऊ शकत नसल्याचे मत डॉ. मलघे यांनी व्यक्त केले.


या प्रसंगी मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कविता आणि कथा अभिवाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा  काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी मानले.

Today’s Horoscope 28 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.