Talegaon : ग्रंथमैत्री, निसर्गमैत्रीसह सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास जगणं सुंदर होईल -डॉ. यशवंत पाटणे

एमपीसी न्यूज – जगणं सुंदर करायचे असेल तर सदगुण,चांगले विचार, छंद, मन ध्यान धारणेत गुंतवावं, ग्रंथमैत्री, निसर्गमैत्री आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या साहाय्याने माणसाला जगणे सुंदर करता येते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले.

श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘हे जीवन सुंदर आहे!’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना डॉ. यशवंत पाटणे श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव काॅलनी, तळेगाव स्टेशन येथे शनिवारी (दि. १६) बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, ज्येष्ठ निवेदक अनिल धर्माधिकारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव व्यासपीठावर उपस्थित होते.

  • याप्रसंगी अनुक्रमे साहित्य, विधी व कायदा आणि शैक्षणिक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यात ज्येष्ठ साहित्यिका नलिनी राजहंस, ॲड. सुरेखा पाटील आणि ‘पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजक’ या विषयावर पीएच. डी. संपादन करणाऱ्या प्रा. डॉ. माधुरी वर्तले यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्रात सेवाभावी कार्य करणाऱ्या श्री. व सौ. विलास कुलकर्णी या दांपत्याला सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, “आता पालक आणि शिक्षक हे सगळी गुणवत्ता फक्त गुणांमध्ये शोधायला लागले आहेत. गुणवत्ता परीक्षांच्या गुणांची बेरीज नसते, गुणवत्ता ही मानवतेमध्ये असते. शेतक-यांच्या श्रमात सुंदरपण लपलेले असते, आईच्या हातात सुंदरपण लपलेले असते. सुंदरपण व गुणवत्तेला जात नसते; परंतु गाता येणे, चित्र काढणे, नावीन्याचा शोध घेणे या वृत्ती मुलांचे आयुष्य समृद्ध करू शकतात. कर्मवीर भाऊराव अण्णा, गाडगेबाबा, बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनातील यश केवळ शालेय शिक्षणात मोजणार का? खरं म्हणजे जीवनातील सुंदरता आपल्यातच दडलेली असते, मात्र तिचा शोध घेता आला पाहिजे.

  • पाण्यात वीज असते; पण त्याला गतिमान केले तर ती बाहेर पडते; तसेच चैतन्य प्रत्येकाच्या मनात असते. पण, त्याला घुसळावे लागते. शालेय गुणांपेक्षा मानवतेत गुणवत्ता शोधली पाहिजे. कुसुमाग्रज म्हणतात, ‘नद्या, आकाश, डोंगर हे सुंदर आहेत; पण या सर्वांहून सुंदर माणूस असतो.’ त्यामुळे तुमचे क्षेत्र कोणतेही असो, त्याचा केंद्रबिंदू माणूस हवा. पैसा, वेळ, ऊर्जा या गोष्टी जीवन सुंदर करण्यासाठी आवश्यक असल्या तरी बालपणी वेळ आणि उर्जा असते. पण, पैसा नसतो. तारुण्यात वेळ देता येत नाही आणि वृद्धापकाळात वेळ आणि पैसा असला तरी ऊर्जा नसते. त्यामुळे जीवनाच्या या तीन टप्प्यांत उपलब्ध असलेल्या गोष्टींतून जीवन सुंदर करता आले पाहिजे.

आधुनिक तंत्रज्ञानाने भौतिक सुबत्ता दिली असली तरी समाधान मात्र हिरावून घेतले आहे. आनंद ही गोष्ट भावनांशी निगडित असते. जपानी वैज्ञानिक वाटारू साटो यांच्या संशोधनानुसार मेंदूतील करड्या रंगाचा द्रव हा माणसाला आनंदाची अनुभूती देतो. सर्व प्राण्यांपैकी फक्त मानवी मेंदूतच हा विशिष्ट द्रव्य आढळतो. संवाद, प्रेम, विश्वास याद्वारे हा द्रव कार्यान्वित राहतो. शरीरविज्ञानाचे एक तत्त्व आहे, की जी तुमच्याकडील पंचेंद्रिये आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करा; अन्यथा कालांतराने ती निरुपयोगी होतात. त्यामुळे अंतर्मुख होऊन अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडेही मानवी जीवन आहे, याचा शोध घ्या.

  • आपल्या ओठांतून बाहेर पडणाऱ्या शब्दाला मांगल्याचा स्पर्श झाला, तर त्याची ओवी तयार होते. सुसंवादात निखळ आनंद असतो; तर वादात केवळ दु:ख वाट्याला येते. आपला आनंद हा नेहमी समाजमान्य असला पाहिजे. संतांनी आणि महापुरुषांनी आम्हाला सुंदर जगण्याचे अनेक मार्ग दिले आहेत. कष्टाने आणि निष्ठेने जीवनात मिळवलेल्या यशाचा आनंद अवर्णनीय असतो आणि तो आपले जीवन सुंदर करून जातो!”

संवादात आनंद असतो, वादात दुःख असते. आनंद शोधावा लागतो. आनंदाची परिमाणे वेगवेगळी आहेत. जगण्यातला आनंद आपणच निर्माण करायचा असतो. आनंद, परस्पर प्रेम हाच जगण्याचा पाया आहे. आपण प्रेम द्यावं, परतत्त्वाचा स्पर्श आम्हाला व्हावा. जगण्यातलं सुंदरपण ज्ञान डोळयातून, संस्काराच्या डोळ्यातून पाहावं. जगण्यातलं दुःख दूर करायचे, मानवधर्म शिकवायचा हे संतांनी दिलेले मंत्र आहेत. एकपट खाणं, दुप्पट पाणी पिणं, तिप्पट चालायचं असतं, तर चौपट हसायचं असतं आणि पाचपट आनंदी राहावं हे जीवनाचे सार आहे. मन स्वच्छ करायचे असेल तर आपल्या विचारावर आणि जगण्यावर अतिक्रमणे झालीत ती दूर केली पाहिजेत. मनाची प्रसन्नता ही कार्यक्षमतेत वाढ करीत असते.

  • प्रार्थना हे जगण्याचे अन्न आहे. मानवी मनातले चैतन्य जागविण्याचे सामर्थ्य विचार आणि संस्कारात असते. आजच्या परिस्थितीत अतिरेकी चंगळवादाने जीवन सौंदर्याची आणि संस्कृतीची मोठया प्रमाणात हानी होत आहे. वाढत्या धर्मद्वेषामुळे समाज जीवन दुभंगत चालले आहे. अशा परिस्थितीत माणसाला सुंदर जगण्याचे प्रयोजन सांगण्याची गरज आहे. परस्पर प्रेम आणि विश्वास हाच सुंदर जगण्याचा पाया आहे.

मानवी जीवनाची सुंदरता ही संपत्तीच्या हव्यासापासून जन्माला येत नाही. आयुष्यभर जपलेल्या मुल्यांमुळे जीवनाला सार्थकता प्राप्त होते. मनुष्याने ज्ञानाच्या बळावर हवा पाण्यापासून वीज, मातीपासून शेती, दगडापासून मुर्ती, निर्माण केली. ज्ञानाचा संबंध जसा निर्मितीशी आहे तसा तो संस्कृतीशी आहे. धनाने माणूस भौतिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकतो, पण मनाने तो असंस्कृत राहिला तर माणसातून पशू निर्माण होऊ शकतो. सुसंस्कृत मानवासाठी मनाच्या शेतीत श्रद्धेची, सदविचारांची बीजे पेरावी लागतात. उत्तमोत्तम ग्रंथांच्या संगतीत यावे लागते, मोहावर मात करित चांगल्या सवयी टिकवाव्या लागतात आणि मुल्यांची पूजा बांधावी लागते. हे जीवन सुंदर आहेच त्यासाठी माणसाने सकारात्मक दृष्टिकोन आणि आंतरिक प्रेमभाव जोपासला पाहिजे.

  • डॉ. यशवंत पाटणे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने व्याख्यान विषयाचे विवेचन केले. कार्यक्रमाच्या संयोजनात बच्चू तांबोळी, धनंजय गुणे, वसंत वर्तक, सुधीर जोशी, अश्विनी शेलार यांनी परिश्रम घेतले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप राजगुरव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.