Talegaon News : कलापिनी बालभवनचा बाल अविष्कार मंच उत्साहात संपन्न

 एमपीसी न्यूज – कलापिनी बालभवनचा बाल अविष्कार मंच उत्साहात संपन्न झाला. या बाल अविष्कार मंचाची सुरुवात 1 मार्च रोजी झाली होती. बालभवनच्या जुन्या ज्येष्ठ प्रशिक्षिका कला वैद्य या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर मंचावर कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे व कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे उपस्थित होत्या.

 

नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पालकांना कलापिनीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि मुलांकडून सुंदर गाणे म्हणवून ही घेतले. प्रमुख अतिथी कला वैद्य यांनी बालभवन असेच उत्साहात चालू राहावे, असे मनोगत व्यक्त केले व बालभवनच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

 

अविष्कार मंचच्या कार्यक्रमात 40 मुलांचा सहभाग होता. मुलांनी प्रार्थना, श्लोक, बडबड गीते, अभिनय गीते गोष्ट, स्वतःची ओळख नृत्य असे अनेक प्रकार सादर केले .

 

मुलांच्या अंगी असणाऱ्या कलेला प्रोत्साहन मिळावं त्यांचा आत्मविश्वास वाढावा व्यक्तिमत्व विकास व्हावा हा अविष्कार मंच घेण्यामागचा उद्देश आहे. आपल्या मुलाला पहिल्यांदाच स्टेजवर सादरीकरण करताना पाहून पालक खुश होते. सर्व मुलांना बालभवनाच्या अनघा बुरसे, वृषाली आपटे, मीरा कोन्नूर, मधुवंती रानडे या ज्येष्ठ शिक्षिकांनी व ज्योती ढमाले, वंदना चेरेकर, विशाखा देशमुख व मनीषा शिंदे या उत्साही प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

 

स्टेजवरील सजावट बालभवनचे पालक रूपाली म्हस्के व प्रशिक्षका केतकी लिमये व वृषाली आपटे यांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांनी व प्रशिक्षकांनी बालभवनची आरोळी सादर केली. शेवटी नटराज प्रार्थना म्हणून कार्यक्रम संपला. मुलांना अव्यान सप्रे या विद्यार्थ्याच्या वतीने खाऊ देण्यात आला. बालभवन प्रशिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.