Vadgaon Maval : अतुल वायकर यांची वडगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – आपला हॉटेल व्यवसाय सांभाळून सामाजिक क्षेत्रातील आपल्या वेगळया कामांच्या माध्यमातून जनमाणसांत आपले स्थान निर्माण केलेले प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते अतुल खंडूजी वायकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वडगाव शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर आदींच्या उपस्थितीत वायकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. अतुल वायकर हे त्यांच्या हाॅटेल व्यवसायासह सामाजिक कामांमुळे मावळसह जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना वडगाव शहराची जबाबदारी सोपवली आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके, राष्ट्रवादी वडगाव अध्यक्ष प्रवीण ढोरे, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, नगरसेवक सुनील ढोरे, संजय गांधी शाखा अध्यक्ष नारायण ठाकर, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, अतुल राऊत, आफताब सय्यद, सोमनाथ धोंगडे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक असल्याने अतुल वायकर यांच्यावर मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराच्या युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अतुल वायकर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. कोरोना काळात मोफत शिवराज थाळीचा दिवसाला पाचशे थाळीचा उपक्रम दीड महिना मोफत राबविला, तसेच मास्क व सॅनिटायझर वाटप, कोरोना काळात रुग्णांना फळे वाटप, स्वतःच्या (3 ऑक्टोबर) वाढदिवसानिमित्त गरजूंना ब्लॅंकेट, अन्नधान्य व फळ वाटप कार्यक्रम सातत्याने सुरू होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. हॉटेल शिवराजच्या माध्यमातून अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यात वायकर अग्रेसर असतात. तसेच आपल्या अनुभवाचा फायदा इतर हॉटेल व्यवसायिकांना व्हावा म्हणून सातत्याने मार्गदर्शन करत असतात.

अतुल वायकर यांची निवड झाल्याबद्दल युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वायकर यांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

युवकांचे संघटन मजबूत करुन युवक नेतृत्व, उद्योग प्रशिक्षण, वक्ता प्रशिक्षण आदी शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. पक्षाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक योजना सर्वसामान्य लोकांमध्ये पोहचविण्याचे लोकोपयोगी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.