Pakistan New PM : पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान बनले शाहबाज शरीफ

एमपीसी न्यूज – इम्रान खान यांच्यावर अविश्वास ठराव पास झाल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ (पीएमएल – एन) पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे पंतप्रधान बनले. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान बनले. शाहबाज शरीफ हे बिनविरोध पंतप्रधान झाले. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

पाकिस्तानमध्ये नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होते. पाकिस्तान संसदेची 340 एवढी सदस्य संख्या आहे. त्यातील 174 मते शाहबाज शरीफ यांना मिळाली, तर केवळ दोन मतांनी इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे शाहबाज शरीफ हे धाकटे बंधू आहेत. नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान झाले होते. शाहबाज शरीफ हे वयाच्या 70व्या वर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. यापूर्वी ते पाकिस्तानमधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत असलेल्या पंजाबचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पंजाब प्रांत हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. शाहबाज शरीफ यांची मागील काही वर्षात स्पष्टवक्ता राजकारणी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी संयुक्त बैठकीत शाहबाज शरीफ यांच्या नावाचा पंतप्रधान पदासाठी प्रस्ताव ठेवला होता. शनिवारी उशिरा पाकिस्तान संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंम्बलीमध्ये इम्रान खान यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला. याद्वारे इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार करण्यात आले. त्यानंतर शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून बिनविरोध निवड झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.