Pimpri News : विचार प्रबोधन पर्वात उलगडले संविधान आणि माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विविध पैलू

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात आले आहे. चार दिवस होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीय संविधान’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात भारतीय संविधान आणि माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील विविध पैलू उलगडले.

कवी, अभिनेते रामदास फुटाणे, प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, अभिनेते किरण माने, अभिनेते कवी किशोर कदम यांनी सहभाग घेतला.

प्रा. डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, महात्मा फुले यांनी दिनबंधुच्या माध्यमातून तसेच त्यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांच्या माध्यमातून माध्यमांचे स्वातंत्र्य कसे असते ते सांगितले आहे. बुद्धांनी सगळ्यांच्या कल्याणाची दिशा दिली. बुद्धाच्या नैतिकतेतून संविधानात अनेक बाबी घेतल्या आहेत. संतांनी सदाचार सांगितला तेही संविधानात आहे. धर्मचिकित्सा, न्यायचिकित्सा संविधानात केली आहे. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी पोटतिडकीने ज्यांनी ज्यांनी सांगितले ते सर्व संविधानात समाविष्ट करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केलं आहे.

भारतातील लोकशाही अजूनही अडाणी आहे. संविधानाची मूल्ये अजूनही भारतात पूर्णपणे रुजलेली नाहीत. त्यामुळे सर्वांना संविधान साक्षर करणे गरजेचे आहे. जे व्यक्तीला स्वातंत्र्य आहे तेच माध्यमांना स्वातंत्र्य आहे. माध्यमांनी देशाच्या एकात्मतेला, सार्वभौमत्वाला बाधा आणायची नाही. राज्याची सुरक्षितता, परकीय देशाशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवणं, नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान न करणे, अब्रू नुकसान न करणे देखील माध्यमांची जबाबदारी आहे. संविधानाच्या कसोटीवर माध्यमांनी चालायला हवं.

अभिनेते किरण माने म्हणाले, “स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधानाची त्रिसूत्री सध्या धोक्यात आली आहे. संविधानाने आपले रक्षण करावे असे वाटत असेल तर आज संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. सत्ताधाऱ्यांची अडचण होऊ लागलेल्या लोकांना हटविण्याचे काम केले जाते. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर माध्यमांना वागावं लागतं. माध्यमांमध्ये काम करणारे अनेकजण संवेदनशील आहेत. पण त्यांचा आवाज दाबला जातोय. याचा जाब प्रत्येकाने विचारायला हवा. मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि मला काढून टाकलं. प्रतिगामी विचार मांडणारी भूमिका मी कधीच करणार नाही.

फुटाणे यांनी ‘जे जे आठवले ते रामदासा सांगितले, परिवर्तना मागितले मंत्रिपद’, ‘जात जात होती, जात जाता जाता जातीला खेटली’ या कवितांमधून त्यांचे मत मांडले. ‘ग्रामीण भागात जाती आजही वाढत आहेत. ती परिस्थिती कमी झाली पाहिजे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी माध्यमांसह नागरिकांनी प्रयत्न करावे. बहुजनांमध्येच एकी राहिलेली नाही. बहुजन समाजातील प्रत्येक घटक स्वतःला वेगळा आणि उच्च समजतो, असे रामदास फुटाणे म्हणाले. माझ्या धर्मापेक्षा संविधान मोठे आहे, अशी शपथ प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे, असेही फुटाणे म्हणाले.

अभिनेते किशोर कदम म्हणाले, “अनेक देशाच्या संविधानातून भारतीय संविधान निर्माण झाले आहे. संविधानाचा वापर करून अनेकांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पण संविधान समजून घेतलं का हा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट समजून न घेता आपण विरोध करतो. विरोधाची कारणमीमांसा आपण तपासून घ्यायला हवी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.