Mumbai News – पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर

एमपीसी न्यूज – भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबातर्फे उषा मंगेशकर यांनी सोमवारी पुरस्काराची घोषणा केली.

उषा मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुंबईत 24 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला येण्याबाबत मोदी यांनी अनुकुलता दर्शवल्याचे उषा मंगेशकर म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी लतादीदींना बहीण मानायचे. पंतप्रधान मोदी जे देशसेवा करत आहेत ते पाहूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की,  प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांना देखील या पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. दीदींच्या नावाला शोभेल अशाच पुरस्कारार्थीला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

उषा मंगेशकर,  हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 ची घोषणा केली. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी राहुल देशपांडे यांना तर सिनेमात भरीव योगदानाबद्दल आशा पारेख व जॅकी श्राफ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.