Talegaon : किशोर आवारे हत्या ते भानू खळदेला अटकेपर्यंतची संपूर्ण कहाणी

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या झाल्याने मावळ परिसरात खळबळ (Talegaon) उडाली. प्रसिद्ध व्यावसायिक, राजकारण व समाजकारणात मोठे नाव असलेला नेता आणि हजारो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या नेत्याची भर दिवसा हत्या झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. 12 मे ते 7 जुलै या 57 दिवसात अनेक घडामोडी घडल्या. किशोर आवारे हत्या ते या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या भानू खळदे याच्या अटकेपर्यंतची संपूर्ण कहाणी….

हत्येच्या काही दिवसांपूर्वी

किशोर आवारे एका खटल्याच्या अनुषंगाने वडगाव मावळ न्यायालयात आले होते. न्यायालयातील काम संपवून ते निघत असताना काही अनोळखी तरुणांनी त्यांना घेरले. आवारे यांच्याकडे थेट त्यांच्या मोबाईल नंबरची त्या तरुणांनी विचारणा केली. हा प्रकार काहीसा विचित्र वाटल्याने किशोर आवारे तत्काळ कारमधून निघून गेले. आपल्या हत्येचा कट शिजतोय, याची कल्पना देखील आवारे यांना आली नाही.

हत्येच्या दिवशी

12 मे रोजी दुपारी बारा वाजता किशोर आवारे आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयात आले. नगरपरिषदेतील काम संपवून जात असताना काही पत्रकारांनी त्यांना एका बातमीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया विचारली. मात्र आपण आता प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असे बोलून ते पुढे निघणार इतक्यात त्यांच्या मागून चार मारेकरी आले. त्यातील एकाने त्यांना पाठीमागून पकडले आणि त्यांच्या मानेत गोळी झाडली. त्यानंतर गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करत आवारे यांची नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर भर दिवसा हत्या करण्यात आली.

आरोपींनी घटनास्थळी येताना कोणतेही वाहन आणले नव्हते. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी दोघांच्या दुचाकी बंदुकीचा धाक दाखवून घेतल्या आणि पळ काढला. मात्र त्या दुचाकी पोलिसांना काही तासात घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ सापडल्या. आरोपी घोरावाडी रेल्वे स्थानकावरून रेल्वेने अथवा इतर वाहनाने गेले याच्या सर्व शक्यता तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले.

इकडे किशोर आवारे यांच्या हत्येची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यात पसरली. कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालय, त्यानंतर रुग्णालय परिसरात गर्दी केली. कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी पाहता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तळेगाव परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला. तळेगाव परिसराला छावणीचे स्वरूप आले.

शहराचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळे आले. त्यातूनही पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली.

खुनाचा गुन्हा दाखल

किशोर आवारे हत्या प्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर, आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात (Talegaon)आला. आमदार शेळके यांचे नाव आल्याने याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

किशोर आवारे यांच्या हत्येनंतर तळेगाव दाभाडे शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला. आवारे यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. 12 मे रोजी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी संपूर्ण रस्त्यावर पोलीस आणि पोलिसच दिसत होते.

13 मे

12 मे रोजी हत्या करून आरोपी पळून गेले. या आरोपींच्या मागावर पोलीस होते. आरोपी सातत्याने त्यांचे ठिकाण बदलत होते. एखाद्या ठिकाणी आरोपी आहेत, अशी माहिती मिळताच पोलीस तिथे जात. तोपर्यंत आरोपी तिथले ठिकाण बदलून नवीन ठिकाणी गेलेले असत. हा पाठशिवणीचा खेळ 12 तासांहून अधिक काळ चालला. अखेर नवलाख उंबरे येथून 13 मे रोजी पहाटे पोलिसांनी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर, संदीप मोरे या चौघांना अटक केली.

तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना

किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख होत्या. दरम्यान, त्यांची चंद्रपूर येथे बदली झाली. काही दिवसातच ती बदली रद्द झाली. त्यानंतर लगेच त्यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली. त्यांची जबाबदारी नवे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आली.

गुन्हे शाखांचे तळेगावला स्थलांतर

तळेगाव परिसर उद्योग, शिक्षण, पर्यटन, कृषी अशा अनेक बाबींनी सुजलाम सुफलाम आहे. त्यातच इथल्या गुन्हेगारीचा पॅटर्नही काही वेगळाच आहे. तळेगाव परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट पाच यांच्या कार्यालयांचे तळेगाव येथे स्थलांतर केले. गुन्हे शाखेची पथके, एसआयटी आणि त्या जोडीला आणखी एक पथक अशी मोठी टीम या हत्या प्रकरणाचा तपास करू लागली.

संशयाची सुई फिरली

अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत धक्कादायक खुलासे केले. किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी गौरव खळदे याने दिली असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर लगेच पोलिसांनी अभियंता असलेल्या गौरव खळदे याला अटक केली. गौरवला अटक होताच त्याचा बाप भानू खळदे बेपत्ता झाला. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी खळदे पितापुत्र असल्याचे जवळपास निश्चित झाले.

म्हणून केली आवारे यांची हत्या

भानुदास खळदे याची तळेगाव दाभाडे परिसरात एक बांधकाम साईट सुरु होती. त्यासाठी रस्ता करताना खळदे यांनी नगरपरिषदेची परवानगी घेऊन झाडांची कापणी केली होती. मात्र किशोर आवारे यांना खळदे यांनी विनापरवाना वृक्षतोड केल्याचे वाटल्याने त्यांनी नगरपरिषदेकडे अर्ज दिला. त्यानंतर खळदे आणि आवारे नगरपरिषदेत एका बैठकीच्या निमित्ताने समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आवारे यांनी खळदे यांना मुख्याधिकारी कार्यालयासमोर कानशिलात लगावली होती. याबाबत खळदे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार (Talegaon) दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करून किशोर आवारे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.

भानुदास खळदे याचा मुलगा गौरव याच्या मनात या प्रकरणाचा राग होता. सर्वांसमोर कानशिलात दिल्याने आपल्या वडिलांची इज्जत गेल्याची भावना त्याच्या मनात होती. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांना जमा करून त्यांना सुपारी देऊन किशोर आवारे यांच्या हत्या घडवून आणली असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

‘ती’ फिर्याद खोटी ठरणार का

भानू खळदे याने मागील काही महिन्यांपूर्वी शिरगाव पोलीस ठाण्यात त्याचे परवानाधारक पिस्तुल हरवले असल्याची फिर्याद दिली होती. त्याच पिस्तुलातील काडतुसे किशोर आवारे यांच्या शरीरात सापडली. दरम्यान पोलिसांनी गौरव खळदे याला अटक केली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर यामध्ये भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे भानू खळदे याने पिस्तुल आणि काडतुसे हरवल्याची दिलेली फिर्याद खोटी ठरणार का. दिशाभूल करण्यासाठी ही फिर्याद देण्यात आली होती का. तसेच या हत्या प्रकरणाचा कट मागील काही महिन्यांपासून शिजत होता का, या सर्व प्रश्नांची उत्तरे भानू खळदे याच्याकडे तपास केल्यानंतर मिळतील.

मास्टरमाईंडसह आठ जणांना अटक

शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, दोघे रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 39, रा. आकुर्डी), श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगल (वय 38, रा. वराळे, ता. मावळ), गौरव चंद्रभान खळदे (वय 29, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे), मनीष शिवचरण यादव (वय 21, रा. चांदखेड. ता. मावळ. मूळ रा. बिहार), चंद्रभान भानुदास खळदे (वय 63, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) या आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

सर्वांचे पोलीस रेकॉर्ड

किशोर आवारे हत्या प्रकरणात गौरव खळदे वळगता अटक केलेल्या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. शाम निगडकर याच्यावर यापूर्वी 1996 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. भानू खळदे याच्यावर 2006 मध्ये हाणामारीचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता किशोर आवारे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अन्य आरोपींवर मारहाण, शस्त्र बाळगणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे, चोरी असे गुन्हे दाखल आहेत.

भानू खळदे हा मागील 57 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो खंडाळा, दौंड, हैदराबाद आणि कालांतराने नाशिक जिल्ह्यातील सिंधी कॉलनीत वास्तव्याला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भानू खळदे याला नाशिक मधून ताब्यात घेतले.

आवारे हत्येचा बदला घेण्याचा कट

आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली. त्यात किशोर आवारे यांचा जवळचा सहकारी म्हणून परिचित असलेल्या प्रमोद सांडभोर याचा समावेश आहे. नुकताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रमोद सांडभोरसह अमित परदेशी, अनिल पवार, शरद साळवी, मंगेश मोरे, अक्षय उर्फ आर्ची चौधरी, देवराज या टोळीवर मोक्का लावला आहे. या आरोपींकडून पोलिसांनी भलामोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

इथवर हे प्रकरण येऊन थांबले आहे. आता भानू खळदे याच्याकडे चौकशी झाल्यानंतर यात नवीन बाबी उजेडात (Talegaon) येतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.