Chakan : प्रेमाच्या त्रिकोणातून खून प्रकरणी फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – आपल्या प्रेयसीला दुसरा तरुण वारंवार बोलत आहे. हा प्रकार प्रियकराला सहन झाला नाही. आपल्या नात्यामध्ये तिसरा आडकाठी बनत असल्याचा समज करून घेत प्रियकराने मित्रांच्या मदतीने आडकाठी ठरणा-या तरुणाचा खून केला. हा प्रकार 14 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास चाकण आळंदी रोडवर गायरानात घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना घटनेनंतर अटक केली. मात्र पाचवा आरोपी अद्याप फरार होता. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने फरार आरोपीला अटक केली.

आकाश गायकवाड (रा. धावडे वस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी अक्षय सोनवणे (रा. चिंबळीगाव, पुणे), अविनाश उर्फ रविराज रोहिदास देडे (वय 22, रा. आदर्शनगर, मोशी), आदित्य मु-हे (रा. मु-हेवस्ती, कुरुळी, पुणे), महादेव भाग्यवंत (रा. मोशी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. नामदेव नागोराव जाधव (वय 32, रा. सोनवणे निवास, विमाननगर पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. व्यंकट नागोराव जाधव (वय 28, रा. सोनवणे निवास, विमाननगर पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना वरील गुन्ह्यात फरार असलेला आरोपी आकाश गायकवाड लातूर वरून परंदवाडी, सोमाटणे फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज (रविवारी) पहाटे चारच्या सुमारास सापळा रचून आकाश याला अटक करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

अक्षय याचे एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरु आहे. नामदेव त्या मुलीला बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र अक्षय याला नामदेवचे त्याच्या प्रेयसीला बोलणे पसंत नव्हते. त्यामुळे अक्षय याने त्याच्या अन्य चार मित्रांच्या मदतीने नामदेवला 14 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमरास चाकण आळंदी रोडवरील रुडाई माता मंदिरापासून पुढे रासे येथील गायरानात नेले. तिथे सर्वानी मिळून ‘नामदेव याने अक्षय याच्या प्रेयसीसोबत कसलेही संबंध ठेवायचे नाहीत’, असे म्हणून नामदेव याला चामडी पट्ट्याने बेदम मारहाण केली.

यामध्ये नामदेव गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. नामदेवचा जर मृत्यू झाला तर आपल्यावर नाव येईल, या भीतीने सर्व आरोपींनी नामदेव याला मोशी येथील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल करत असताना आरोपींनी नामदेव याचा अपघात झाला असल्याचे सांगितले. नामदेव याच्यावर उपचार सुरु होताच सर्वानी रुग्णालयातून पळ काढला. मात्र, उपचारापूर्वीच नामदेवचा मृत्यू झाला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू केदारी, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, सावन राठोड, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.