Khadakwasala Dam Update: खडकवासला धरण 100 टक्के भरले, 11 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज – सततच्या संततधार पावसाने खडकवासला (Khadakwasala Dam Update) धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) दुपारी एक वाजल्यापासून धरणातून 11 हजार 900 क्यूसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. हा विसर्ग पाऊस व धरणातील पाणी पातळीनुसार कमी जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत पाणीसाठ्यात  गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 22.96 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 21.86 टक्के भरले आहे.

वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 121.96 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 33.59 टक्के भरले आहे. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 141 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 108.04 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 35.82 टक्के भरले आहे.

Lonavla Body Found: भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

पावसाचा जोर आणखी चार दिवस कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील (Khadakwasala Dam Update) पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जून महिन्यात पावासाने चांगलीच ओढ दिल्यामुळे पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले होते. मात्र, या आठवड्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.