Pimpri : रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागा; रुग्णालयामध्ये धुम्रप्रान करणा-यांवर दंडात्मक कारवाई करा’

स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या सूचना 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘वायसीएमएच’ रुग्णालयामधील प्रत्येक वार्डात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. सुरक्षाव्यवस्था कडक करावी. रुग्णालयामध्ये धुम्रप्रान करणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी. रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागावे. रुग्णालयात होणा-या अवघड व दुर्मिळ शस्त्रक्रियांची दर आठवड्याला प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी डॉक्टरांना दिल्या आहेत. 

महापालिकेचा वैद्यकीय विभाग, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम विभाग आणि वायसीएमएच विभागाच्या समन्वय व सुसूत्रीकरणासाठी मडिगेरी यांनी आज (शनिवारी) बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वासीएमएचचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

देशातील व राज्यातील सर्वोत्कृष्ट संस्था होण्यासाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमास आवश्यक ती मदत महापालिकेतर्फे देण्यात येईल. महापालिकेच्या ‘पीजी’ संस्थेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निती आयोगाच्या बैठकीमध्ये उल्लेख केला होता. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे असे सांगत सभापती मडिगेरी म्हणाले, रुग्णालयात येणा-या रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना सौजन्याची वागणूक देण्यात यावी. रुग्णाला भेटण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी वेळ निश्चित करावी. रुग्णाजवळ पूर्णवेळ राहणा-यांसाठी ‘ग्रीन कार्ड’ व रुग्णांना भेटण्यासाठी येणा-यांना ‘पींक कार्ड’ची व्यवस्था करण्यात यावी.

वायसीएमएच, महापालिका रुग्णालयात होणा-या अवघड आणि दुर्मिळ शस्त्रक्रियांची दर आठवड्याला प्रसिद्धी देण्यात यावी.  रुग्णालयामध्ये धुम्रपान, गुटखा खाणा-यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी. रुग्णालयात प्रवेश करताना भेटायला येणा-यांची तपासणी करावी. प्रवेशद्वाराजवळ सूचना फलक लावण्यात यावेत. रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था, डॉक्टर, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी नेमण्यासाठी पोलिसांशी पत्रव्यवहार करावा, असेही मडिगेरी यांनी सांगितले.

काही वेळा नातेवाईकांकडून तोडफोड केली जाते. डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी कायमस्वरुपी पोलीस चौकीची मागणी गृह मंत्रालयाकडे करण्यात यावी, अशा सूचना मडिगेरी यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. पदाधिकारी आणि नगरसेवकांशी सुसंवाद साधण्यासाठी 133 नगरसेवकांचे मोबाईल ‘सेव्ह’ करावेत. यापुढे दर 15 दिवसांनी पहिल्या व तिस-या शनिवारी रुग्णालयाच्या अडीअडचणी व सुधारणा संदर्भात बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.