Vadgaon Maval : जातीयवादी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र व्हावे – अजित पवार

मावळ विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने कान्हे फाटा येथे आयोजित मेळावा

एमपीसी न्यूज- जातीयवादी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सर्वच समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एका विचाराने व एकदिलाने आघाडीच्या उमेदवाराचे काम करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कान्हे फाटा येथे सुरू करण्यात आलेल्या मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयाचे उदघाटन अजित पवार यांचे हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माऊली दाभाडे, दिलीप ढमाले, उमेश पाटील, किरण गायकवाड, अॅड खंडू तिकोणे, अनंता लायगुडे, यशवंत मोहोळ, कृष्णा कारके, गणेश खांडगे, सुभाष जाधव, अशोक घारे, मयुर ढोरे, राजू शिंदे, संभाजी राक्षे, राजू बच्चे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, “केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नोटाबंदी, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका यामुळे देशाची दुरवस्था झाल्याची परिस्थिती आहे. कारखानदारी उध्वस्त झाली, काळापैसा आला नाही, सुटबुटातील हे सरकार आहे, गरीबांचे सरकार नाही. हे सरकार बघ्यांची भूमिका घेत आहे. यामुळे हे सरकार घालविण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे. त्यासाठी मतभेद विसरून काम करावे” विधानसभा जागांबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच अंतिम निर्णय घेतील व तोच निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिलाने काम करून जिल्ह्यातील चारही जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी करतील. असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केला. पै चंद्रकांत सातकर म्हणाले, “तालुक्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केल्यास पार्थ पवार यांना तालुक्यातून एक लाख मतांची आघाडी मिळेल”

मदन बाफना, दिलीप ढमाले, किरण गायकवाड, मयूर ढोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. अॅड खंडू तिकोणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.