Vadgaon Maval : न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दुप्पट फीवाढ ; पालकवर्गामध्ये संताप

एमपीसी न्यूज- रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलकडून पालकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानकपणे फीवाढ केली आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी पंचायतसमितीच्या गटशिक्षण अधिकारी मंगला वाव्हळ यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, या शुल्कवाढीला जून महिन्यांपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक शंकर डुबल यांनी सांगितले.

या शाळेतील विद्यार्थ्यांची वार्षिक फी गेल्या दोन वर्षांपासून 8000/- रुपये होती आता मात्र अचानक पालकांना कोणत्याही पूर्वकल्पना न देता वार्षिक फी 15000/- केली असून दरवर्षी 5% टक्के वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळेमध्ये अल्पउत्पन्न गटातील पालकांची मुले शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना वाढीव फी परवडणारी नाही.

फीवाढी संदर्भात पालकांनी शाळेतील मुख्याधापकांना तसेच शिक्षकांना विचारले असता त्याच्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. फी वाढ मान्य नसल्यास मुलांना शाळेतून काढून टाका असे सांगण्यात आल्याचे पालकांनी म्हटले आहे. यासाठी सर्व पालकांनी सोमवारी आपल्या पाल्याना घेऊन गट शिक्षण अधिकारी मंगला वाव्हळ यांना निवेदन दिले असून शासनाने याबाबत ठोस कारवाई करावी अन्यथा सर्व पालकवर्ग एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या मनस्थितीत असून वेळप्रसंगी आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याच्या पवित्र्यात आहेत असा इशारा पालकांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, शिक्षण विभाग व पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय शाळेला फी वाढ करता येणार नाही. पालकांनी दिलेल्या निवेदनाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.