Chikhali : चिखलीत ‘एक गाव एक शिवजयंती’ निमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – चिखली ग्रामस्थांच्या वतीने ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, सामाजिक मंडळे, संघटना एकत्र येऊन गेली सहा वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करीत आहेत.

पराशर मोने यांचे ‘शिवचरित्राचे महत्व’ या विषयावर  मंगळवार दि.१० मार्च रोजी सायं.७ वा व्याख्यान होणार आहे. तर रात्री ९ वा संतकृपा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.११ मार्च रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबिर होणार असून यावेळी मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. यामध्ये मोफत मधुमेह , नेत्र, डेंग्यू ,मलेरिया, हिमोग्लोबिन, दंत चिकित्सा, आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी होणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.

गुरूवार दि.१२ मार्च सकाळी ९ वाजता शिवनेरी येथून आलेल्या शिवज्योतीचे पूजन होऊन शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तर सकाळी १० वाजता भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५ वा. रायगडावरील २५ फुटी जगदीश्वराच्या मंदिर प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारून ढोल पथक, मल्लखांब पथक,वारकरी पथक, राजस्थानी गेर नृत्य,ध्वजपथके यांच्या साथीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच अठरा पगड जातीतील विविध संतांचा रथ या पारंपरिक मिरवणुकित सहभागी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.