Vinayak Nimhan: माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुण्यातील माजी आमदार विनायक महादेव निम्हण (Vinayak Nimhan) (वय 59) यांचे आज (बुधवारी) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा विभानसभेवर निवडून गेले होते.

विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांना दुपारी तीनच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विनायक निम्हण यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) रात्री नऊ वाजता पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

Pune Fire News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात चार तासांत 17 ठिकाणी आगीच्या घटना

विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांच्या मागे पत्नी माजी नगरसेविका स्वाती निम्हण, मुलगा माजी नगरसेवक चंद्रशेखर तथा सनी निम्हण तसेच मधुरा व गायत्री या कन्या तसेच सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक अमित गावडे व उद्योजक राहुल गावडे यांचे ते मामा होत. भाऊबीजेच्या दिवशी मामांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विनायक निम्हण यांनी सोमेश्वर फाऊंडेशनची स्थापना करून पाषाण परिसरात मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. शिवसेना शाखाप्रमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. 1995 मध्ये ते शिवसेनेचे विभागप्रमुख झाले. 1999 मध्ये सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आले.

शिवसेनेच्या तिकिटावर ते (Vinayak Nimhan) दोनदा निवडून आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. नारायण राणे यांच्या समवेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेसच्या तिकीटावर एकदा विधानसभेवर निवडून गेले होते.

सत्तेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. जनसामान्यांसाठी लढणारा एक लढाऊ नेता अशी त्यांची ओळख होती. ‘आबा’ या टोपणनावाने ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या निधनामुळे पाषाण परिसरावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही वर्षांत त्यांनी सक्रिय राजकारणातून लक्ष काढून ते व्यवसायावर केंद्रीत केले होते. ‘सनीज वर्ल्ड’ उभे करण्यात आणि नावारुपाला आणण्यासाठी अपार परिश्रम घेतले.

एमपीसी न्यूज परिवाराचेही ते मार्गदर्शक होते. एमपीसी न्यूजच्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन विनायक निम्हण यांच्या हस्ते झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.