Vishwanath Shetty’s 75th Birthday: हॉटेल बॉय ते औद्योगिक कॅन्टीन क्षेत्रातील भीष्माचार्य : विश्वनाथ शेट्टी यांचा प्रेरणादायी प्रवास

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – हॉटेल बॉय ते पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक कॅन्टीन क्षेत्रातील भीष्माचार्य असा नेत्रदीपक जीवनप्रवास असलेले विश्वनाथ देजप्पा शेट्टी हे आज (17 सप्टेंबर) वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. ‘दिवसा हॉटेलमध्ये काम आणि रात्रशाळेत अभ्यास, लहान वयातच खांद्यावर पडलेली संपूर्ण परिवाराची जबाबदारी, शून्यातून सुरुवात करीत उभारलेला इंडस्ट्रीयल कॅन्टीनचा समूह, पिंपरी-चिंचवडमधील सर्वात पहिल्या सुसज्ज अशा शीतल हॉटेलची स्थापना, खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याबरोबरच त्यांच्या पोटाची प्रेमाने काळजी घेत पिंपरी- चिंचवडकरांच्या हृदयात स्थान मिळविणाऱ्या विश्वनाथ शेट्टी यांच्या अमृतमहोत्सवी वाटचालीची ही आगळीवेगळी कहाणी सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

विश्वनाथ शेट्टी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1946 रोजी मुंबईत एका कर्नाटकी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुंबई येथे हॉटेल व्यवसायिक होते. अचानक कौटुंबिक आपत्ती कासळल्यामुळे त्यांच्या वडीलांना हॉटेल व्यवसाय बंद करून आपल्या मूळगावी मुडूबळ्ळे येथे परतावे लागले. विश्वनाथ शेट्टी यांनी आठवीपर्यंत शिक्षण आपल्या मूळगावी पूर्ण केले. काही कारणास्तव लहान वयातच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी यांच्या खांद्यावर पडली. म्हणून त्यांना स्वप्ननगरी मुंबईत परतावे लागले.

उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी होती. त्यांनी एका ठिकाणी हॉटेल बॉय म्हणून काम स्वीकारलं. राहण्याची व खाण्याची सोय तसेच दरमहा दहा रूपये पगारावर काम सुरू झालं. हा पगार ते घरातील लहान भावडांच्या खर्चासाठी गावी पाठवीत असत. स्वतःचे शिक्षणही पूर्ण करण्यासाठी, दिवसा काम करून कर्नाटक फ्री नाईट स्कूल या रात्रशाळेत त्यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले.

काहीतरी मोठं करण्याची इच्छा विश्वनाथरावांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्यांनी मुंबईतली हॉटेल बॉयची नोकरी सोडून 1965 ला पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर आबासाहेब गरवारे कॉलेज कॅन्टीनचे मॅनेजर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. शंभर रुपये वेतनावर तब्बल सात वर्षं त्यांनी या कामाचा अनुभव घेतला.

औद्योगिक कॅन्टीन समूहाची उभारणी
आपलं स्वतःच काहीतरी सुरू करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी 1972 साली पौड फाटा येथे ‘साईनाथ आश्रम’ हे हॉटेल चालवायला घेतले. तीन वर्ष हॉटेल चालवल्यानंतर 1975 साली त्यांनी पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील उपहारगृहाकडे म्हणजे कॅन्टीन व्यवसायाकडे लक्ष देण्याचे ठरवले. त्यांनी 1975 साली शहरातील ‘क्लोराईड इंडिया’ कंपनीत म्हणजे सध्याच्या एक्साईड बॅटरी कंपनीत स्वत: कॅन्टीन चालवायला घेतले. त्यानंतर विश्वनाथरावांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी औद्योगिक कॅन्टीनचा मोठा समूह उभा केला.
हा संघर्ष सुरू असतानाच त्यांनी आपल्या तीन बहिणींचे विवाह करून दिले. अनेक होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. ‘उपहारगृहातील कर्मचारी, औद्योगिक कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापन यांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्य यामुळेच एवढी वर्षे सातत्याने सेवा देऊ शकलो,’ असे विश्वनाथ शेट्टी आवर्जून सांगतात. म्हणून चाळीस वर्षापूर्वी चालवण्यासाठी घेतलेले औद्योगिक उपहारगृह अजूनही यशस्वीरित्या चालू आहे.

‘शीतल रिफ्रेशमेंट’ची मुहूर्तमेढ!

पिंपरी चिंचवड परिसरात एक सकस, सुसज्ज आणि दर्जेदार चवीचे हॉटेल सुरू करण्याचा बहुमान देखील विश्वनाथ शेट्टी यांनाच जातो. 1991 मध्ये विश्वनाथरावांनी चिंचवड स्टेशन जवळ ‘शीतल रिफ्रेशमेंट’ नावाने शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट सुरू केले. आजही या हॉटेलचा चाहतावर्ग लाखोंच्या संख्येत आहे. स्वच्छता, निटनेटकेपणा, दर्जेदार चव आणि आदरातिथ्य यामुळे खवय्यांसाठी शीतल नेहमीच हॉट डेस्टिनेशन राहिले आहे. शहरातील सर्वात जुनं आणि दर्जेदार जेवण देण्यात शहातील प्रमुख हॉटेलमध्ये ‘शीतल’ हॉटेलचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

‘ग्राहकांचे समाधान हाच आपला व्यवसायातील फायदा आणि हेच व्यवसायाचे गमक आहे,’ असं शेट्टी सांगतात. ‘आजही हॉटेल मध्ये तयार केल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाची चव मी चाखतो, त्याचा दर्जा तपासतो त्यानंतरच ते ग्राहकांना दिले जाते,’ असे विश्वनाथ शेट्टी यांनी सांगितले.

उच्चशिक्षित व सुखी कुटुंब

विश्वनाथ शेट्टी यांच्या खांद्यावर बालवयात कुटुंबाची जबाबदारी पडली तरी त्यांनी सर्व आव्हाने लिलया पेलत, सर्वांना पायावर उभे केले. अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शेट्टी यांचे कुटुंब मात्र उच्चशिक्षित व सुखी आहे. त्यात शेट्टी यांच्या पत्नी विलासिनी, मुलगा विरेन शेट्टी (बी. कॉम, डी.बी.एम), सून देवी शेट्टी, मुलगी डॉ. श्वेता शेट्टी (डॉक्टर) व जावई डॉ. विनयकुमार शेट्टी, दुसरी मुलगी शिल्पा शेट्टी (एम.सी.एस) दुबई स्थित व जावई निरंजन शेट्टी (बी.ई) आहे. घरी पाच गोड नातवंडांमध्ये ते हरवून जातात. पुत्र विरेन शेट्टी हे आता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.

‘हॉटेल व्यवसायाला उज्ज्वल भवितव्य आहे, पण, कोरोनासारखी संकटं हद्दपार व्हायला हवीत. या व्यवसायात येण्यासाठी आता व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे, त्यानंतर योग्य मार्गदर्शनाखाली व्यवसाय कारावा,’ असा सल्ला शेट्टी हॉटेल व्यवसायात येणा-यांना देतात.

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असून, प्रत्यक्ष भेट न देता फोन व सोशल मिडीयाच्या माध्यमातून मित्र व हितचिंतकांनी शुभेच्छा द्याव्यात,’ असे आवाहन विश्वनाथ शेट्टी व त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

यशाचे शिखर गाठायचे असेल तर, पडेल ते कष्ट करण्याची तयारी आणि निरंतर प्रयत्न केल्यास ते शक्य होते.’ असाच संदेश विश्वनाथ शेट्टी यांचा संपूर्ण जीवनप्रवास देतो. विश्वनाथ शेट्टी यांना एमपीसी न्यूज परिवारातर्फे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

विविध पदांचे व सन्मानांचे मानकरी!

  • पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनचे संस्थापक सदस्य विश्वनाथ शेट्टी आहेत. बरीच वर्ष त्यांनी असोसिएशनचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. सध्या ते सल्लागार म्हणून काम पाहतात. व्यवसायिकांना येणा-या विविध अडचणी, समस्यांवर मार्गदर्शन करण्याचे काम ते करतात.
  • पिंपरी चिंचवड शहरात उडपी बांधवाना एकत्र करून त्यांनी पिंपरी-चिंचवड बंट संघाची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 1976-78 या काळात शेट्टी अध्यक्ष असताना संघाचे कार्यालय स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या संघात जवळपास दीड हजार सभासद आहेत.
  • श्री श्री गुरूदेवानंद स्वामी यांच्या भक्तांची असलेली गुरुसेवा बलगा कमिटीचे विश्वानाथ शेट्टी सल्लागार आहेत.

सन्मान

  • 1991 – औद्योगिक उपहारगृहांचा दीर्घ अनुभव पाहता महाराष्ट्र शासनातर्फे शेट्टी यांची हॉटेल इंडस्ट्रियल कॅन्टीन व क्लब यांच्या किमान वेतन कमिटीवर नियुक्ती
  • 1994 – मॅथर ॲन्ड प्लॅट इंडिया लि. कंपनी युनियनने ‘बेस्ट कॅन्टीन कॉन्ट्रक्टर’ म्हणून सन्मान.
  • 1997 – पिंपरी चिंचवड आण्णासाहेब मगर सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘बेस्ट इंडस्ट्रियल कॅन्टीन कॉन्ट्रक्टर पुरस्कार’.
  • 2002 – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद यांच्या सहयोगाने ‘उद्योग मित्र’ हा मानाचा पुरस्कार.
  • 2006 – साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त क्रां. लहुजी वस्ताद साळवे तरुण मंडळाच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार’
  • 2018 – पुण्यात तुळ भाषा आणि समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल पुणे तुळ कुटा संस्थेच्या वतीने मानपत्र देऊन ‘आदर्श समाजसेवक’ म्हणून सन्मान.
  • 2019- उडपी मजूर दोड्डामने फॅमिली वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मानपत्र देऊन ‘आदर्श समाजसेवक’ म्हणून मूळगाव मुडूबळ्ळे येथे सन्मान.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.