Talegaon News : तळेगाववर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रा. शिरीष अवधानी यांचे निधन

एमपीसी न्यूज (विश्वास देशपांडे) – तळेगाववर आणि तळेगावातील विविध संस्थांवर मनापासून प्रेम करणारे विविध संस्थांना, तसेच तळेगावातील विशेष कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना सन्मानित करून सर्व प्रकारची मदत करणारे प्रा. शिरीष अवधानी यांचे 9 सप्टेंबर रोजी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.

गेली 2 ते 3 वर्षे ते विविध आजारांशी झुंजत होते. त्यांना आठवड्यातून दोन वेळा डायलेसीस करावे लागे. रक्त बदल झाला की ते परत जोमाने कार्याला लागत.

अवधानी सर हाडाचे शिक्षक होते. पुणे विद्यापीठाचे एमएस्सी बीएड असलेल्या अवधानी सरांनी 30 वर्षे वालचंदनगरच्या वर्धमान विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्राचे शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी इंग्लंड, फ्रान्स तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया, नेवाडा, कोलोरॅडो, कॅनडा, आरोझोना या राज्यांचा अभ्यास दौरा केला होता.

नाट्य चळवळीत त्यांनी दिग्दर्शन, लेखन आणि आयोजन असे योगदान दिले होते. तळेगावमध्ये त्यांचे नयना आभाळे यांच्या कॅप संस्थेत मोलाचे योगदान होते. ते श्रीरंग कलानिकेतनचे माजी अध्यक्ष होते. शेजार ज्येष्ठ नागरिक संघाचे ते क्रियाशील सदस्य होते. काही काळ त्यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेतही योगदान दिले होते तळेगाव नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे ते नियुक्त सभासद होते.

कलापिनी संस्थेशी त्यांचे जवळचे नाते होते त्यांना कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांच्या सांस्कृतिक चळवळीतील योगदान खूपच भावले होते म्हणूनच त्यांनी डॉ. अनंत परांजपे यांच्या तळेगाव आणि कलापिनीच्या योगदानाची दाखल घेणारे ‘ध्यास पुरुष’ हे पुस्तक प्रकाशित केले होते व त्या माध्यमातून कलापिनीच्या नवीन रंगमंचासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला होता. तळेगावचा निसर्ग आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये यावर त्यांनी पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांनी तळेगावातील अनेक अप्रसिद्ध गुणीजनांचा गौरव केला होता.

अवधानी सरांचे असंख्य विद्यार्थी देशात आणि परदेशात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. आपल्या आयुष्यातल्या अखेरच्या क्षणांपर्यंत त्यांनी व्याधींशी कडवी झुंज देत तळेगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिले.

तळेगावकरांच्या मनात अवधानी सरांच्या स्मृती कायमच कोरल्या गेल्या आहेत. त्यांच्या निधनाने तळेगावकर प्रामाणिक प्रेम करणारे सच्चे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. मागच्याच महिन्यात त्यांच्या पत्नींचे निधन झाले होते. त्यांच्यावर आधारित एक पुस्तक अवधानी सरांनी लिहून पुर्ण केले होते त्याचे प्रकाशन मात्र होऊ शकले नाही त्यांचे पुत्र योगेश आणि कन्या सौ.योगिता पाटील त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील.

त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात कलापिनी परिवार, श्रीरंग कलानिकेतन, आणि तळेगावातील सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था सहभागी आहेत. त्यांना तळेगावातील सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम कलापिनी सांकृतिक केंद्र येथे शनिवार दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4.30 वा. आयोजित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.