CM Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन;बिहारमध्ये झालेल्या दुर्घटनेतील जखमींना तातडीने मदत मिळाल्याची जाधव कुटुंबीयांची भावना

एमपीसी न्यूज –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे बिहार राज्यात राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाला मदत मिळाली आहे. पाटणा शहरात राहणाऱ्या अमोल जाधव यांच्या घरात स्फोट झाला होता. घरातील चार कुटुंबीयांना दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांची खूप मदत झाली अशी भावना व्यक्त करीत एकनाथ शिंदे यांच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन झाल्याची प्रतिक्रिया अमोल जाधव यांच्या भावाने दिली. 

 

President Election : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा; आज मतदान

 

या दुर्घटनेत जखमी झालेले अमोल जाधव यांचे भाऊ डॉक्टर किरण जाधव म्हणाले, 20 वर्षापासून माझा भाऊ बिहारमध्ये राहतो. शुक्रवारी पहाटे त्यांच्या घरात एसीचा ब्लास्ट झाला. यामध्ये घरातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बिहार राज्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई शहरात घेऊन जाण्यासाठी सांगितले.

 

 

तिथून पुण्याला आणण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. काहीच सुचत नव्हते. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या काही मित्रांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आमची परिस्थिती समजून घेत तातडीने हालचाली केल्या आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याच्या आधी तुमच्या कुटुंबीयांना उपचारासाठी पुण्यात हलवू असे आश्वासन त्यांनी दिले होते. ते आश्वासन त्यांनी पूर्णही केले. दोन विशेष विमानाने त्यांनी आमच्या कुटुंबीयांना उपचारासाठी पुण्यात आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आम्हाला विठ्ठलाचे दर्शन झाले, अशी भावना यावेळी किरण जाधव यांनी बोलून दाखवली.
दरम्यान या दुर्घटनेत अमोल जाधव यांना तुलनेने कमी दुखापत झाली आहे. तर त्यांच्या पत्नी आणि दोन मुली मात्र गंभीर जखमी आहेत. या तिघांना पुण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर सूर्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.