Wakad : फोनवरुन महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – वृत्तपत्राच्या एका सदरात प्रकाशित झालेले महिलांचे मोबाईल क्रमांक घेऊन महिलांशी अश्लील संभाषण करणा-या एका मनोविकृतास वाकड पोलिसांनी अटक केली.

प्रशांत शंकर मोरे (वय 30, रा.डेक्कन जिमखाना परिसरातील फिरस्ता, मूळ कल्याण, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम तीन मोबाईल क्रमांकावरून फोन करून अश्लील संभाषण करत असल्याची तक्रार काही महिलांनी वाकड पोलिसांकडे केली. ही बाब गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ महिलांना ज्या मोबाईल क्रमांकावरून फोन येत होते. त्याबाबतची माहिती काढली असता खडकीमधील एका बेकरीमधून संबंधित एक मोबाईल फोन चोरीला गेल्याचे समजले. या मोबाईल चोराबाबत माहिती मिळवली असता त्या बेकरीत एक दिवस काम केलेल्या एका कामगाराने मोबाईल चोरल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी दुस-या आणि तिस-या मोबाईल क्रमांकाची माहिती काढली असता ते मोबाईल फोन देखील चोरीला गेल्याचे समजले. महिलांना फोन करून आरोपी मोबाईल फोन बंद करत होता. आणि तो फिरस्ती असल्याने एका जागी जास्त वेळ थांबत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना कठीण झाले. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला माहिती मिळाली की, ज्या मोबाईल क्रमांकावरून महिलांना फोन जात आहे, त्याच मोबाईल क्रमांकावरून एका वृद्ध नागरिकाला फोन करण्यात आला आहे.

एवढ्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित वृद्धाची भेट घेऊन त्या मोबाईल क्रमांकाविषयी चौकशी केली. त्यावेळी वृद्धाने त्याला त्याच्या जावयाने त्या मोबाईल क्रमांकावरून फोन केल्याचे सांगितले. त्याचा जावई मागील सहा महिन्यांपासून घरी गेलेला नसून तो फिरस्ती आणि मनोविकृत आहे. सध्या तो पुण्यातील जंगली महाराज रोडवर एका चौपाटीवर काम करत असल्याचेही वृद्धाने सांगितले. यावरून वाकड पोलिसांनी सापळा रचून प्रशांत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळ तीन चोरीचे मोबाईल फोन मिळून आले. महिलांना ज्या मोबाईल क्रमांकावरून फोन केले जात होते. तेच मोबाईल फोन असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी मोबाईल फोन जप्त करत आरोपीला अटक केली.

ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीष माने, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिष माने, मोहन जाधव, पोलीस कर्मचारी प्रमोद भांडवलकर, नितीन गेंगजे, शाम बाबा यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.