Pimpri: पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी सुधाराचा ‘डीपीआर’ तयार

राज्य सरकारच्या मान्यतेनंतर कामाला होणार सुरुवात

एमपीसी न्यूज – साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीवर नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट (एचसीपी)सल्लागाराने तयार केला आहे. त्याला राज्य सरकारची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती महापौर राहुल जाधव, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

नदी सुधार प्रकल्प विकास आराखड्याचे (डीपीआर) एचसीपीचे कुणाल पटेल यांनी पदाधिका-यांसमोर बुधवारी (दि.24)सविस्तर सादरीकरण केले. चिंचवड येथील अॅटोक्लस्टर सभागृहात झालेल्या सादरीकरणास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड उपस्थि होते होते.

महापौर जाधव म्हणाले, “गुजरातमधील साबरमतीच्या धर्तीवर शहरातील नदीपात्राची सुधारणा करण्यात येणार आहे. नदी किनारी हिरवळ जोपासली जाणार आहे. झाडे, लॉन अशा सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर हे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. इंद्रायणी नदीवर तळवडे ते चिखली आणि पवना नदीवर देखील पहिल्या टप्प्यात काम करण्यात येणार आहे”

संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, नदी सुधार प्रकल्पासाठी पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नदीपात्रालगतच्या परिसराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल एचसीपी या सल्लागार संस्थेने तयार केला आहे. भराव टाकलेली ठिकाणे, मंदिर, पत्राशेड, सांडपाण्याचे नाले, किती दूषित पाणी नदीपात्रात सोडले जाते याची माहिती संकलित केली आहे. पात्रालगतच्या पालिकेच्या मिळकतींची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त केली आहे.
नदीपात्रातील लाल रेषा आणि निळ्या रेषा तपासून पूर नियंत्रण क्षेत्राचे डिझाईन तयार केले आहे. भविष्यात नदी सुधार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लगतच्या भागात वाणिज्य विषयक कॉम्प्लेक्स काढले जाणार आहे. त्याच्या माध्यमातून माध्यमातून निधी गोळा संकलित केला जाणार आहे’.

‘पवना नदीवरील दापोडीतील एसटीपी प्रकल्पालगतची जागा, थेरगाव बौध्द विहारची जागा, नाशिक फाटा ते पिंपळे गुरव परिसरातील नदीपात्राची जागा उपयोगात आणली जाणार आहे. तर, इंद्रायणी नदीपात्रात डिअर सफारी पार्कलगतची जागा, आळंदी बंधा-यालगतची शहराला लागून असलेली जागा उपयोगात आणली जाणार आहे’, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.