Pune : पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार

एमपीसी न्यूज – पुणेकरांना (Pune) पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत केवळ 16.19 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 55.55 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे. तर, ग्रामीण भागातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची जून महिन्यापर्यंत तहान भागविण्याचे जलसंपदा विभागापुढे आव्हान आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (24 फेब्रुवारी) होणाऱ्या बैठकीत पुण्याच्या पाण्यात कपात होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

पुणेकरांच्या पाण्यावरून नेहमीच टीका केली जाते. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. यावेळी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Pune : मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत – श्रीकांत देशपांडे

खडकवासला प्रकल्पात 16.19 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी पुणे महापालिकेला उन्हाळी हंगामादरम्यान मार्च ते 15 जुलैअखेर सुमारे 7.8 टीएमसी पाणी दिले होते. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पिण्याचे पाणी; तसेच शेतीसाठी विना कपात पाणी देणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. (Pune)

रब्बी हंगामात शेतीला पाणी देताना 0.5 टीएमसी पाणी बचत केल्याचा जलसंपदा विभागाने दावा केला आहे. पुणे जिल्ह्यात यापूर्वी पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर आणि शिरूर तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील 16 गावांमध्येही दुष्काळग्रस्त स्थिती जाहीर करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणेकरांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.